कोकणात जोरदार, मराठवाड्यात कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय हवामान विभागाने (‘आयएमडी’ने) यंदाच्या नैर्ऋृत्य मोसमी वाऱ्यांसोबत येणाऱ्या पावसाचा (मॉन्सून) दुसरा सुधारित अंदाज मंगळवारी (दि. १) जाहीर केला. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात १०१ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज जून महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे.
या वेळचा अंदाज पहिल्यांदाच देशातील ३६ हवामान विभागांतल्या पावसाचा अंदाज आयएमडीने सांगितला आहे. त्यानुसार कोकणात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. ऑनलाईन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली.
प्रशांत महासागरात ‘ला निना’ स्थिती तयार झाल्याचा फायदा मॉन्सूनला होणार आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यंदा सरासरीच्या १०१ टक्के पावसाचा अंदाज आहे. यात चार टक्के कमी किंवा जास्त फरक गृहित धरण्यात आला आहे. वायव्य भारतात सर्वसाधारण (९२ ते १०८ टक्के) तर दक्षिण द्वीपकल्पात साधारण (९३ ते १०७ टक्के) पावसाची शक्यता आहे. उत्तर पूर्व भारतात सरासरीपेक्षा कमी (९५ टक्क्यांहून कमी) पावसाची शक्यता आहे. मध्य भारतात सर्वाधिक पाऊस (१०६ टक्क्यांहून अधिक) पडण्याची शक्यता आहे.
चौकट
दुष्काळाची शक्यता अगदी कमी
‘मॉन्सून मॉडेल’नुसार यंदा दुष्काळ म्हणजेच सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता फक्त ८ टक्केच आहे. सरासरीच्या ९० ते ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता १८ टक्के आहे. तर, सरासरीच्या ९६ ते १०४ अशा सर्वसाधारण पावसाची शक्यता ४० टक्के आहे. सरासरीपेक्षा जास्त १०४ ते ११० टक्के पावसाची शक्यता २२ टक्के आहे. तर खूप जास्त म्हणजे सरासरीच्या ११० टक्के पावसाची शक्यता १२ टक्के आहे.
चौकट
‘कोअर झोन’मध्ये १०६ टक्के पाऊस
भारताच्या दृष्टीने शेतीचे क्षेत्र व त्या ठिकाणी पडणारा पाऊस अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने हवामान विभागाने यंदा प्रामुख्याने शेतीक्षेत्राचा समावेश असलेल्या कोअर झोन निश्चित केला आहे. त्या ठिकाणी १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चौकट
कोकण, पूर्व विदर्भात जूनमध्ये अधिक पाऊस
हवामान विभागाने यंदा प्रथमच हवामान विभागानुसार अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार कोकण, आणि पूर्व विदर्भात जून महिन्यात सरासरीच्या तुुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असणार आहे.
चौकट
मॉन्सूनचे आगमन उशिरा?
सध्या केरळमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस पडतो आहे. अंदमानात पोहोचलेला मॉन्सून केरळात पोहोचल्याचे जाहीर करण्यासाठी आवश्यक पाऊसमान, वाऱ्यांची दिशा हे निकष अजून पूर्ण झालेेले नाहीत. त्यामुळे यंदा मॉन्सून केरळात थोडा उशिरा म्हणजे ३ जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मॉन्सून आल्यानंतर त्याच्या पुढच्या वाटचालीबद्दल सांगितले जाते. मात्र केरळातील आगमनानंतरही मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस थोडा उशीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.