पिंपरी : जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला असो अथवा शाळा सोडल्याचा दाखला, जन्म-मृत्यू नोंदणीचे प्रमाणपत्र; पैसे मिळताच काही दिवसांत घरपोच आणून देणारा एजंट पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सायबू हनुमंता पल्ले यांच्या तक्रारीच्या आधारे चिंचवड पोलिसांनी सापळा रचून शनिवारी दिनकर लिंबाजी म्हस्के (वय ४९, रा. आनंदनगर, चिंचवड) या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या कार्यालयात बनावट प्रमाणपत्रांचा ढीग आढळून आला. गणेशनगर, थेरगाव येथे राहणारे सायबू हनुमंता पल्ले हे किराणा दुकानदार आहेत. त्यांनी बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या दिनकर म्हस्के याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलगा शुभम याला शैक्षणिक सवलत मिळावी, यासाठी अनुसूचित जातीचे जातवैधता प्रमाणपत्र पाहिजे होते. आनंदनगर येथे राहणाऱ्या म्हस्के याने अवघ्या १५ दिवसांत जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देतो, असे सांगून पल्ले यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले. पल्ले यांच्या मुलाचे जातवैधता प्रमाणपत्र त्याने दिले. पुण्यातील शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये शुभमने प्रवेश घेतला असल्याने, तेथे जातवैधता प्रमाणपत्र सादर केले होते. काही दिवसांनी संबंधित जातवैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचे शैक्षणिक संस्थेने पल्ले यांना कळविले. जातवैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचे कळविल्याने म्हस्के याने ते शासकीय कार्यालयातून मिळवून न देता, स्वत:च तयार करून दिले असल्याचा संशय त्यांना आला. पल्ले यांनी तातडीने चिंचवडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. के. कुबडे यांच्याकडे धाव घेतली. म्हस्केच्या विरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आनंदनगर येथे आरोपी म्हस्के याला ताब्यात घेतले. त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता, त्या ठिकाणी विविध प्रकारची बनावट प्रमाणपत्रे आढळून आली. त्यामध्ये जातवैधता प्रमाणपत्र ५ (लातूर कार्यालय), शाळा सोडल्याचे दाखले १२ (काजळी, उस्मानाबाद येथील विद्यालयांच्या नावे), जन्म-मृत्यू प्रमाणपत्र ८ (उस्मानाबाद), उत्पन्नाचे दाखले ९२ (पिंपरी-चिंचवड नायब तहसीलदार कार्यालय) अशा विविध प्रमाणपत्रांचा समावेश आहे. परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुबडे, पोलीस निरीक्षक आर. पी. बागुल, आर जे घुगे, धोंडोपंत पांचाळ, शांताराम हांडे, विलास कार्ले, विजय भुसारे, चंद्रकांत गडदे, संतोेष केंगळे या पथकाने कारवाई केली.त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता, त्या ठिकाणी विविध प्रकारची बनावट प्रमाणपत्रे आढळून आली. त्यामध्ये जातवैधता प्रमाणपत्र ५ (लातूर कार्यालय), शाळा सोडल्याचे दाखले १२ (काजळी, उस्मानाबाद येथील विद्यालयांच्या नावे), जन्म-मृत्यू प्रमाणपत्र ८ (उस्मानाबाद), उत्पन्नाचे दाखले ९२ (पिंपरी-चिंचवड नायब तहसीलदार कार्यालय) अशा विविध प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
आनंदनगरमध्ये बनावट प्रमाणपत्रांचा ढीग
By admin | Published: June 05, 2016 4:04 AM