पुणे : बदलती जीवनशैली, जास्त कॅलरीजचे बाहेरचे खाणे, ताणतणाव, एकाजागी बसून ८ ते ९ तास काम, झोपण्याची अयोग्य वेळ, तरुणांमध्ये वाढत असलेले व्यसनांचे प्रमाण अशा अनेक कारणांमुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले असल्याची माहिती डायबेटिक असोसिएशन आॅफ इंडिया, पुणे या संस्थेचे कार्यवाह डॉ. रमेश गोडबोले यांनी दिली.आज कालची तरुणाई शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून लांब राहते आहे. त्यामुळे घरच्या जेवणाला ही मुले मुकलेली आहेत, भूक लागल्यावर बर्गर, पिझ्झा, चायनिज यांचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश होताना दिसत आहे. त्यामुळे शरीरातील कॅलरीज वाढून मधुमेह होण्याचे धोके संभवतात. तसेच कामातील वाढते ताणतणाव, घरातल्या माणसांशी हरवत चाललेला संवाद, व्यायामाचा अभाव या अशा अनेक कारणामुळे मधुमेहासाठी जे पोषक वातावरण असते ते तयार होताना दिसत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.दर पाच माणसाच्या मागे एक मधुमेह झालेला रुग्ण आढळत आहे, पूर्वी मधुमेहाचे प्रमाण ३ ते ४ टक्के होते, पण आता ते प्रमाण १९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मधुमेहामुळे हृदयविकार, डोळ््यांचे आजार, मुत्रपिंडाचे आजार मुलांमध्ये लवकर होताना दिसत आहे. यासाठी तरुणांनी स्वत:ची काळजी स्वत:च घ्यायला हवी. रोजच्या धावपळीतून किमान एक तास व्यायामासाठी द्यावा, जेणे करुन त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहील. आहाराकडे लक्ष द्यावे, बाहेरचे खाणे शक्यतो टाळावे. जवळच्या जवळ जाताना गाडी घेऊन न जाता चालत जावे जेणेकरुन आपला व्यायामही होईल आणि कामही होईल, अशी काळजी जर तरुणांनी घेतली तर नक्कीच मधुमेहाचे प्रमाण कमी होताना दिसेल.
तरुणांमध्ये वाढतेय मधुमेहाचे प्रमाण...
By admin | Published: November 14, 2015 3:10 AM