पुणे : डॉ. विक्रांत सणगर याच्या पॅनाशिया केअर डायग्नोस्टिक लॅबकडून क्रिस्पर कॅस टेस्टिंग या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कोरोनाचे कमी वेळेत अचूक निदान करणाऱ्या चाचणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही चाचणी उपलब्ध असलेल्या टाटा मोबाईल व्हॅनचे उद्घाटन १ मे रोजी होणार आहे. हे तंत्रज्ञान वापरणारी पीसीडी ही आयसीएमआरची मान्यता मिळालेली भारतातील पहिली प्रयोगशाळा ठरली आहे.
सध्या कोरोनाच्या निदानासाठी आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन अशा दोन चाचण्या केल्या जातात. आरटीपीसीआरचा अहवाल येण्यासाठी दोन-तीन दिवस लागतात. याला पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा सर्व स्तरावरील लोकांना अचूक व तत्काळ निदानासाठी होणार आहे.
डॉ. विक्रांत सणगर यांनी ''लोकमत''ला सांगितले, ''क्रिस्पर कॅस टेस्टिंग ही चाचणी जेनेटिक इंजिनिअरिंगवर आधारित आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेची मान्यता मिळालेली पीसीडी ही भारतातील प्रयोगशाळा आहे. या चाचणीची अचूकता ९८ टक्के इतकी आहे. नाकातील किंवा घशातील नमुना घेऊन ही चाचणी केली जाते. तीन तासांत चाचणीचा अहवाल प्राप्त होतो. चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे ब्राझील, युके, भारत, साऊथ आफ्रिका अशा सर्व व्हेरियंटचे निदान करणे शक्य होते.''
मोबाईल व्हॅनमध्ये सहा जणांची टीम कार्यरत आहे. एका वेळी ९६ नमुन्यांचे टेस्टिंग होऊ शकते. सुरुवातीला दिवसभरात २००० नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. ही क्षमता पाच-सहा हजारांपर्यंत वाढवणे शक्य आहे. औंध जिल्हा रुग्णालय परिसरात व्हॅन उपलब्ध होणार आहे.