पुणे : अपघात, ह्रदयविकाराचा धक्का, प्रसूती आदी तातडीची उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना माेफत रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या ‘डायल १०८’ या रुग्णवाहिकेने गेल्या दहा वर्षांत ८ लाख ८२ हजार ४५२ रुग्णांना पुण्यात माेफत रुग्णवाहिकेची सेवा दिली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजेच ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे वैद्यकीय आणीबाणीचे व त्या खालाेखाल प्रसूतीचे आहेत.
डायल १०८ माेफत रुग्णवाहिका सेवा ही राज्यात सन २०१४ साली तत्कालीन सरकारने सुरू केली हाेती. बीव्हीजी आणि राज्य सरकारचा हा संयुक्त उपक्रम असून, या सेवेला सुरू हाेऊन एक दशक पूर्ण हाेत आहे, तेव्हापासून आतापर्यंत कार्यक्षमतेने आणि शिस्तीने सुरू असलेला हा उपक्रम आहे. त्यामुळे सर्वसामान्य व तातडीच्या रुग्णांना माेफत रुग्णवाहिका सेवा मिळत आहे. एखाद्या रुग्णाला तातडीने दाखल करायचे झाल्यास माेबाइलवरून १०८ नंबर डायल केल्यास व माहिती दिल्यास शहरात १० मिनिटांत, तर ग्रामीण भागात १५ मिनिटांत ही रुग्णवाहिका घटनास्थळी येते.
मेडिकल इमर्जन्सीचे रुग्ण सर्वाधिक
सर्वाधिक सेवा ही मेडिकल इमर्जन्सीच्या रुग्णांना देण्यात आली. त्यांची आकडेवारी ५ लाख ५८ हजार इतकी आहे. यामध्ये हार्टअटॅक, पॅरालिसिस किंवा स्ट्राेक, डेंग्यू, न्युमाेनिया, टीबी, मलेरिया, उष्माघात, चक्कर येऊन पडणे या प्रकारच्या रुग्णांचा समावेश हाेताे. ही आकडेवारी एकूण रुग्णांच्या तुलनेत ६३ टक्के इतकी प्रचंड आहे.
प्रसूतीच्या महिलांनाही लाभ
वैद्यकीय आणीबाणीनंतर या सुविधेचा सर्वाधिक लाभ काेणाला झाला असेल, तर ताे प्रसूतीसाठी दाखल हाेणाऱ्या महिलांना झाला आहे. गेल्या दहा वर्षांत पुणे शहर व जिल्ह्यांत १ लाख ४२ हजार गर्भवतींना रुग्णवाहिकेची सेवा मिळाली. एकूण रुग्णांच्या तुलनेत यांची संख्या १६ टक्के आहे, तसेच काही महिलांची दवाखान्यात घेऊन जात असताना रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली आहे.