लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते व सेलिब्रेटींकडून फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यापाठोपाठ आता पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणेकरांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. एका एजन्सीचीही याकरिता निवड करण्यात आली असून एजन्सीमार्फत महापौरांचे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, ई-मेल खाते हाताळण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने यावर दर महिन्याला तब्बल २५ हजारांचा खर्च केला जाणार आहे. महापालिका प्रशासनाने महापौरांचे सोशल मीडियावरील अकाउंट हाताळण्यासाठी एका संस्थेची नियुक्तीचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला मान्यता देण्यात आली आहे. महापौरांचे सोशल मीडिया अकाउंट हाताळण्यासाठी तीन संस्था पुढे आल्या होत्या. त्यापैकी महिना २५ हजार रुपये दराने काम करण्याची तयारी दर्शविलेल्या संस्थेला याबाबतचे काम देण्यात आले आहे.महापालिकेतर्फे राबविले जाणारे कार्यक्रम, महत्त्वाची धोरणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापौरांच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर केला जाणार आहे. माजी महापौर प्रशांत जगताप यांचेही सोशल मीडिया अकाऊंट हाताळण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. त्यासाठी महापालिका प्रशासनाद्वारे दरमहा २० हजार रुपयांचा खर्च केला जात होता. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे काम बंद करण्यात आले होते. निवडणुकीनंतर पालिकेमध्ये सत्तांतर झाले. महापौर मुक्ता टिळक यांनी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा त्याचे काम संस्थेला देण्यात आले आहे.
सोशल मीडियाद्वारे पुणेकरांशी संवाद
By admin | Published: June 26, 2017 4:01 AM