पुणे : सध्याच्या युगात सर्वांनीच आपलं आयुष्य हे आभासी जगतावर केंद्रित केले आहे. ज्यावेळी कोरोनाला सुरूवात झाली. त्यानंतर हळूहळू ऑनलाइन खरेदी दालनं/ संकेतस्थळं किंवा वितरण व्यवस्था बंद झाली. तेव्हा एकमेकांच्या मदतीला आसपासचीच लोक धावून आली. सोशल मीडियावर ‘हँपी मदर्स डे’च्या दिवशी आईचा फोटो किंवा स्टेटस अपलोड केले जाते. पण शेजारी बसलेल्या आईला आपण शुभेच्छा देऊ शकत नाही. जर आईच्या पाया पडत नसू किंवा तिच्याशी आदरयुक्त संभाषण करीत नसू तर त्या स्टेटचा काय उपयोग? असा सवाल प्रसिद्ध लेखक प्रीतम ओसवाल यांनी उपस्थित केला आहे.
आपण आयुष्यात योग्य व्यक्तींवर लक्ष्य केंद्रित करायला हवं ते न केल्यास आपण कायमच काल्पनिक विश्वात रमूू आणि एक दिवस असे काही कोसळू की कुणी उठवायला देखील आसपास राहणार नाही. यासाठी आपल्या व्यक्तींबरोबर अधिकाधिक वेळ घालवावा, असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
लेखक प्रीतम ओसवाल यांच्या ‘हाकुना मटाटा’ या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी शंकर रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानी झाले. त्यावेळी पुस्तकावर त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगला. यावेळी अजिंक्य जैन, विलास ओसवाल आणि प्रीतम ओसवाल यांचं कुटुंबीय उपस्थित होते,
वयाच्या १६ व्या वर्षी हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा मला लेखनाचे महत्व कळले. त्यावेळी माझ्या मनात जे विचार यायचे ते मी डायरीत उतरवायचो. २०१३ ला माझं ‘टू रिप्लेस गॉड वॉज अँन आऊटकम ऑफ इट’ पहिलं पुस्तकं बाजारात आलं. त्यानंतर दोन पुस्तकं लिहिली. मी कायमच लेखनात प्रयोगशील राहाण्याचा प्रयत्न केला. आज माझी चारही पुस्तकं वाचली तर त्यात काहीसं वेगळ्या विचारसरणीचं लेखन गवसेल. माझी डायरी हीच माझी स्पेशल फ्रेंड आहे. जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर या डायरीनेचं मला साथ दिली आहे. हीच डायरी प्रत्येकाची स्पेशल फ्रेंड बनावी अशी माझी इच्छा असल्याचे ते म्हणाले.