पुणे : काेराेनाप्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे उत्पादन सिरममध्ये सध्या बंद आहे. मात्र, केंद्र सरकारकडे पुरेशा प्रमाणात काेविशिल्ड लसीचे डाेस उपलब्ध आहेत, अशी माहीती सिरम इन्स्टिटयूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली.
भारती विद्यापीठाच्या भारती सुपर स्पेशालिटी आणि स्टुडंट हाऊसिंग कॉम्प्लेक्सचे उदघाटन रविवारी झाले. त्यानंतर पत्रकारांशी ते बाेलत हाेते. सध्या काेराेनामुळे नागरिक बुस्टर डाेस घेण्यासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, त्यांना काेविशिल्ड लसच उपलब्ध नाही. याबददल थेट पुनावाला यांना विचारले असता ते म्हणाले की, 'केंद्र सरकारकडे कोविशिल्ड लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तर कोविशिल्ड लसीचे उत्पादन सध्या बंद आहे. तूर्तास उत्पादन बंद असले तरी आवश्यकता भासल्यास पुन्हा सुरू केले जाईल. नाेव्हाेव्हॅक्स व सिरमचे संयुक्त लस असलेल्या कोव्होव्हॅक्स लसीबाबत बाेलताना ते म्हणाले की, नवीन व्हेरिएंटविरोधात कोव्होव्हॅक्स जास्त परिणामकारक आहे. त्यामुळे पुढील दहा-पंधरा दिवसांत कोव्होव्हॅक्स लसीला बुस्टर डोसाठी लवकरच परवानगी मिळेल.