पुणे : पोटाला सहजरित्या खायला मिळत असल्याने बिबट्यानेभीमाशंकर अभयारण्यात राहण्यास नापसंती दर्शविल्याचे स्पष्ट होत आहे. तो आता अभयारण्याबाहेरच अधिक वावरत असून, हक्काचे घर असलेल्या अभयारण्यापासून तो दूर जात आहे. आता ऊस हेच त्याचे घर बनले असून, गावाशेजारील कुत्री, शेळी, मेंढी, डुक्करे हे भक्ष्य त्याला सहज मिळत आहे. परिणामी तो अभयारण्यापासून दूर जात आहे.
भीमाशंकर अभयारण्य हे बिबट्यांचा अधिवास होता. पण आता तिथेच बिबट्या दिसून येत नाही. बौद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणी गणनेत एकही बिबट्या अभयारण्यात दिसला नाही. इतर सांबर, शेकरू, चितळ मात्र दिसले. वन विभागाच्या वतीने भीमाशंकर अभयारण्यात पाच मे रोजी बौद्धपोर्णिमेनिमित्त प्राणी गणना करण्यात आली. पण पाऊस व दाट धुक्यामुळे प्राणी गणना करताना अडथळा आला. परिणामी पाणवठ्यांवर प्राण्यांची संख्या कमी दिसून आली आहे. यंदा अभयारण्यातील आठ पाणवठ्यांवर वनकर्मचारी व वन्यजीव प्रेमी बसविले होते.
अभयारण्यात पूर्वी बिबट्याचा अधिवास होता. त्यानंतर ऊसाची शेती वाढल्यावर तो भीमाशंकर साेडून इतरत्र आंबेगाव, चाकण, लोणावळा, तळेगाव दाभाडे, मंचर, घोडेगाव आदी ठिकाणी वावरत आहे. ऊसाच्या शेतात त्याला राहणे सोपे जाते. मादी बिबटलाही तिथे प्रजनन करायला अनुकूल गोष्टी आहेत. म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये ऊसाच्या शेतात बिबट्या राहत असल्याचे पहायला मिळत आहे. गावाशेजारी कुत्रे, डुक्करे, शेळी, मेंढी हे भक्ष्य त्याला सहज मिळते. म्हणून तो जंगल सोडून इतर ठिकाणीच अधिक आढळून येत आहे.
सलग दुसरे वर्ष दर्शन नाही
अभयारण्यात प्रत्यक्ष कोणालाच बिबट्या दिसला नाही. पण ट्रॅप कॅमेऱ्यात तो दिसल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी देखील बिबट्या अभयारण्यात दिसला नव्हता. अभयारण्याबाहेर मात्र ओतूर व इतर ठिकाणी बिबट्या दिसून आला आहे. खरंतर बिबट्या अभयारण्य सोडून जुन्नर, आंबेगाव, शिरूर आदी भागात वावरत आहे.
''यंदाच्या प्राणी गणनेत बिबट्याचे दर्शन झाले नाही. इतर सांबर, रानडुक्कर, ससा, शेकरू, भेकर आदी प्राणी पहायला मिळाले. - वसंत चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, भीमाशंकर अभयारण्य''
''बिबट्याला ऊस हक्काचे घर झाले आहे. त्यातच तो अधिक राहत आहे. त्याला पिल्लेही दोन-तीन होत आहेत. त्यांची संख्या वाढतेय. अभयारण्यातून तो कधीच गायब झाला आहे. अभयारण्यात त्याला त्याचे खाद्य उपलब्ध व्हायला हवे. बिबट्यांसाठी खास ठोस धोरण ठरवायला हवे. अन्यथा भविष्यात बिबट्यांचा सर्वत्र वावर दिसेल. - प्रभाकर कुकडोलकर, माजी वनअधिकारी''