डिंभे : मागील शैक्षणिक वर्षातील सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीचे दुसरे वर्षे संपायला आले तरी अद्याप आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा झाली नाही. शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने चौकशीसाठी पालकांचे शाळांकडे हेलपाटे सुरू झाले आहेत. यामुळे मागील वर्षाची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी आंबेगाव तालुका शिक्षक समितीच्या वतीने एका लेखी निवेदनाद्वारे घोडेगाव प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून दरवर्षी जि.प. व माध्यमिक शाळांत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती दिली जाते. उपस्थिती भत्ता असे नाव असणाऱ्या या शिष्यवृत्तीस पुढे राज्याच्या सुवर्णजयंतीनिमित्त या शिष्यवृत्तीचे नामकरण करून ते सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती असे करण्यात आले. ही शिष्यवृत्ती मुलांच्या उपस्थितीच्या प्रमाणात दिली जाते. इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा १०० रुपये व ८ ते १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांस दरमहा २०० रुपये असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. शाळांतील आदिवासी विद्यार्थ्यांचे गैरहजेरीचे प्रमाण कमी व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याने ७५ टक्के हजेरी भरल्यासच सदर विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र होतो.या वेळी शिक्षक समितीचे अध्यक्ष संतोष राक्षे, सरचिटणीस राजेंद्र शेळकंदे, सुरेश लोहकरे, संतोष गवारी, ठकसेन गवारी, सखाराम वाजे, मधुकर भारमळ, तानाजी सोनवणे इत्यादींनी प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिष्यवृत्ती मिळणेबाबत निवेदन सादर केले. (वार्ताहर)
गुरुजी शिष्यवृत्ती आली का हो ?
By admin | Published: January 24, 2017 1:49 AM