पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी पिंपरी-चिंचवड परिसरात मेट्रोची पाहणी केली. आणि त्यानंतर सफरही केली. त्यांच्या याच मेट्रो सफरीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जातात. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महामेट्रोवर हक्कभंग दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मेट्रो प्रशासनाने खुलासा देत शरद पवार केवळ मेट्रो प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आले होते असे सांगितले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा ट्विट करून मेट्रो प्रशासनाला काही प्रश्न विचारले.
आपल्या ट्विटमध्ये चंद्रकांत पाटील म्हणतात, 'राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मेट्रो प्रवासाबाबत महामेट्रोचा खुलासा वाचून हसूच आलं. पवारसाहेबांना माहिती घेण्यासाठी स्वतः मेट्रो स्टेशनला जावं लागलं? बरं, तेही मान्य, पण मेट्रोप्रवासाचं काय? एक चक्कर मारून आणा असा हट्ट पवारसाहेबांनी केला, असं तरी महामेट्रोनं सांगू नये! महामेट्रोच्या खुलाशातलं साडेचार वर्षांत पवारसाहेब कधीच फिरकले नाहीत, हे वाक्य महत्त्वाचं... प्रकल्प पूर्ण होताना त्यांना तिकडे जावंसं वाटलं, ही भेट गुप्त ठेवावी लागली यातून बरंच काही स्पष्ट होतंय. हे सगळं आयत्या पिठावरच्या रेघोट्या असंच नाहीये का?'
विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा दिला होता इशारा
शरद पवार यांनी सोमवारी मेट्रोतून प्रवास केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मेट्रोची चाचणी घेऊन जणू काही त्यांच्यामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प झाल्याचे प्रशासनाने भासविणे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी घेतल्याबद्दल मेट्रोच्या प्रशासनाविरोधात आपण विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला होता.