पुणे : ठाकरे बाप-लेकांचा औरंगाबादला दौरा सुरू आहे. त्यांचा अडीच तासांचा दौरा मी पाहिला पण त्या अडीच तासांत फक्त २४ मिनिटे ते बांधावर राहिले. त्यांना २४ मिनिटांमध्ये काय दुष्काळ दिसला असेल माहित नाही, अशी टीका कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर पुण्यात मंगळवारी केली.
राष्ट्रीय पातळीवरील फलोत्पादन मूल्य साखळीसंबंधीच्या कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत ते म्हणाले, पावसामुळे राज्यात जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई दुप्पट देण्याचा निर्णय आम्ही घेतला. केंद्राकडून ७५ टक्के व राज्याकडून २५ टक्केचा वाटा त्यात असतो. राज्यात ४५०० कोटी नुकसान भरपाई दिली. त्यासाठी राज्यभर फिरलोय.सध्याच्या नुकसानीची आकडेवारी घेतोय. १५ लाख हेक्टरहून अधिक झाले आहे. त्याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना मदत देऊ. जे नुकसान झाले त्याचे पंचनामे आले की लगेच भरपाई देण्यात येईल. नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून सुटणार नाही. ओला दुष्काळ जाहीर झाला तर ३२ टक्के उसाचे क्षेत्र आहे. मग त्यांनाही द्यायचे का ? बाकींच्याचे काय करायचे ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मी राजीनामा देण्यास तयार
विरोधी पक्ष म्हणतात की, दोन वर्षांनी निवडणूका झाल्यावर तुमचे काय होईल, ते पहा. पण मी म्हणतो दोन वर्षे कशाला आताच मी राजीनामा देतो आणि विरोधकाने माझ्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. बघू काय होते ते ? मी मुख्यमंत्र्यांना याबाबत परवानगी मागितली आहे. त्यांनी जर परवानगी दिली, तर लगेच राजीनामा देईन, असे आव्हान सत्तार यांनी विरोधकांना दिले आहे.