पुणे : नदीची स्वच्छता आणि सुशोभीकरण यासाठी महापालिकेने मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत पाच वर्षे सर्वेक्षण करून प्रकल्पाचे डिझायनिंग करण्यात आले आहे. महापालिकेच्या ४ हजार ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राची मान्यताही मिळाली आहे. प्रकल्प प्रत्यक्षात उतरविताना नदीपात्रातून जाणारे काही रस्ते बंद करून पर्यायी मार्ग तयार केले जाणार आहेत, तर नदीच्या पातळीपर्यंत असलेले बाबा भिडे पूल, अमृतेश्वर पूल आदी पूल काढून ते उंच करावे लागणार आहेत.
नदी प्रदूषणमुक्त करणे, प्रवाहातील अडथळे दूर करणे, नदी, तसेच आजूबाजूच्या परिसराचा विकास आणि सुशोभीकरण, पुराचा धोका कमी करणे, असे विविध उद्देश डोळ्यांसमोर ठेवून नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. बुधवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे डिजिटल सादरीकरण करण्यात आले. प्रकल्पासाठी ७६८ हेक्टर जागा उपलब्ध होणार आहे. नदीपात्राची वहनक्षमता व रुंदी वाढविली जाणार आहे.
नदीपात्रात येणारे मैलापाणी शुद्ध करून नियोजित जायका प्रकल्पातून, तसेच अस्तित्वातील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातून १०० टक्के शुद्ध होईल याची दक्षता घेण्यात येत आहे. नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. मैलापाणी या यंत्रणेमध्ये प्रक्रिया करून त्यानंतर नदीत सोडण्यात येणार आहे. नदीची स्वच्छता आणि संवर्धन करतानाच घाटांचे सुशोभीकरण, नागरिकांना नदीशी जोडण्यासाठी आवश्यक असणारे उपक्रम यांचाही बारकाईने विचार करून नियोजन करण्यात आले आहे.