पुणे : शासनाच्या डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. मात्र, विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी बँक केवायसी करणे गरजेचे आहे. तसेच बँक खाते अपडेट ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा शिष्यवृत्तीची रक्कम परत जाऊ शकते. परंतु, पुणे जिल्ह्यात बहुतांश विद्यार्थ्यांनी याबाबत काळजी घेतली असल्याचे समाज कल्याण विभागाकडून सांगितले जात आहे.
राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, एकलव्य शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती आधी शिष्यवृत्ती दिल्या जातात. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून नियोजित वेळेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. शिष्यवृत्ती अर्ज भरताना त्यात अचूक माहिती भरावी तसेच बँकेशी निगडित असणारी माहिती व्यवस्थित द्यावी, असे आवाहन वेळोवेळी उच्चशिक्षण विभागाने केले आहे. पुण्यातून शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. काही जिल्ह्यांत विद्यार्थ्यांनी बँक खाते न केल्यामुळे त्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम परत गेली आहे.
पुणे जिल्ह्यातून ३४ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला, त्यातील संस्था स्तरावर ३७२० अर्ज प्रलंबित आहेत, तर विद्यार्थी स्तरावर २८०७ अर्ज प्रलंबित आहेत. जिल्हास्तरावरून ९४४ अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्याचे बाकी आहे. इन्स्टिट्यूट स्तरावर वन २८ हजार ४२९ अर्ज करण्यात आले असून, जिल्हास्तरावरून २८ हजार ११ अर्ज शिष्यवृत्तीसाठी अप्रू करण्यात आले आहेत.