पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचे (सेट) ७ एप्रिल रोजी आयाेजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दि. १२ ते ३१ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. एप्रिल महिन्यात हाेणाऱ्या ३९व्या सेट परीक्षेसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरणे तसेच परीक्षेसंदर्भातील वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक माहिती विद्यापीठाच्या https://setexam.pune.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये तसेच इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागासवर्गिय, इडब्ल्यूएस, विकलांग प्रवर्ग, एससी, एसटी, अनाथ आणि तृतीयपंथीय उमेदवारांसाठी ६५० रुपये परीक्षा शुल्क आहे. तसेच दि. १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत पाचशे रुपये विलंब शुल्क भरून अर्ज करता येणार आहे.
सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सेट परीक्षा मुंबई, पुणे, काेल्हापूर, साेलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिराेली, रत्नागिरी व पणजी गाेवा या केंद्रांवर घेण्यात येणार आहे.