अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्रिपद मागितलं? भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत?; चर्चेवर अजित पवारांचं रोखठोक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:22 PM2024-09-10T12:22:28+5:302024-09-10T12:25:22+5:30

मला मुख्यमंत्रिपद द्यावं, अशी मागणी अजित पवारांनी अमित शाह यांच्याकडे केली असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले होते.

Did you ask Amit Shah for the post of Chief Minister Ajit Pawars answer | अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्रिपद मागितलं? भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत?; चर्चेवर अजित पवारांचं रोखठोक उत्तर

अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्रिपद मागितलं? भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत?; चर्चेवर अजित पवारांचं रोखठोक उत्तर

NCP Ajit Pawar ( Marathi News ) : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रि‍पदाची मागणी केल्याची चर्चा रंगत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात बिहार पॅटर्न राबवला जावा आणि मला मुख्यमंत्रिपद द्यावं, अशी मागणी अजित पवारांनीअमित शाह यांच्याकडे केली असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले होते. मात्र यामध्ये कसलेही तथ्य नसून मी मुख्यमंत्रि‍पदाबाबत अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत दिलं आहे. तसंच महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी मागणी केल्याची चर्चाही अजित पवारांनी फेटाळून लावली आहे.

अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीविषयी माहिती देताना अजित पवार म्हणाले की, "मुख्यमंत्रि‍पदाबाबतच्या चर्चेमध्ये कसलंही तथ्य नाही. मी अमित शाह यांच्या बैठकीत त्यांच्याशी कापूस, सोयाबीन आणि कांदा उत्पादकांसह इतर प्रश्नांवर चर्चा केली. यापुढे कांद्याची निर्यातबंदी होऊ नये, तसंच आपण एफआरपीचे दर वाढवतो मात्र एमएसपीमध्ये वाढ झालेली नाही, ती वाढ करावी, अशा विविध मागण्यांबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली," असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

महायुतीत जागावाटपाचं काय ठरलं?

भाजपकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात किमान १५० जागा मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. याविषयी बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. हा फॉर्म्युला ठरल्यानंतर आम्ही तुम्हाला याबाबतची माहिती देऊ.

लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवाद?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य सरकारच्या योजनेवरून महायुतीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांकडून या योजनेशी संबंधित एका पोस्टरवर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचाच फोटो लावण्यात आला होता. त्यावर बोलताना अजित पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. "मीच त्या पदाधिकाऱ्यांना माझा फोटो लावू नका, असं सांगितलं होतं. कारण सध्या माझा फोटो सगळीकडे लागत असल्याने त्या पोस्टरवर माझा फोटो नाही लावला तरी चालेल, असं मी सांगितलं होतं," असं अजित पवार म्हणाले.

Web Title: Did you ask Amit Shah for the post of Chief Minister Ajit Pawars answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.