पुणे : आरोहदादा, तुझ्या मम्मी-पप्पांनी तुला इंजिनिअरिंग किंवा मेडिकललाच जायचं असं बजावून सांगितलं असतानाही तू अभिनयाच्या क्षेत्रात आला. त्यांच्या निर्णयाविरोधात जाताना तुला भीती नाही का वाटली? तू त्यांची समजूत कशी काढली? आणि तुला त्यांनी नंतर सपोर्ट तर कसं केलं? अशी एक ना अनेक प्रश्न चिमुकल्यांनी केली. अभिनेता आरोह याला अक्षरश: भंडावून सोडलं. आरोहनेसुध्दा फुल एन्जॉय करत, त्यांना समजेल अशा भाषेतच अभिनयासह करिअरचे गूज उकलले.
बालदिनानिमित्त लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने आयोजित ‘लोकमत बाल पत्रकार’ या कार्यक्रमांतर्गत पुण्यातील चिमुकल्यांनी आयव्ही युनिव्हर्सच्या माध्यमातून ‘द बेस’ या स्टुडिओला भेट दिली. तेथे मुलांनी ‘रेगे’ फेम आरोह वेलणकर याच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांच्याच टीमने मुलांसमाेर पुस्तकातील गोष्टी नाटकाच्या माध्यमातून सादर केल्या. मुलांना पोट धरून हसवले.
आरोह म्हणाला की, ज्या क्षेत्रात काम करतो, त्यामध्ये थकवा यायला नको. संयम ठेवून काम करत राहायचे. भविष्यात नक्की बक्षीस मिळेल, असा आत्मविश्वास हवा. मी करून दाखवणार असा विश्वास असला पाहिजे. ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यासाठी कष्ट हेच त्याचे मोठे धोरण असते. यशस्वी होण्यासाठी कठीण परिश्रम महत्त्वाचे आहेत. घरच्यांना करिअर करायचे त्यासाठी संवाद करत राहणे आवश्यक आहे, शिक्षकांशीसुद्धा यावर बोलले पाहिजे. यावेळी आरोहसोबत मुलांनी 'केसरिया' हे गाणे गात धम्माल मजा केली.
चिन्मय केळकर, राम सइदपुरे, महेंद्र वाळुंज, गौतमी आहेर, वर्धन देशपांडे यांनी 'पकडा त्या मांजराला' आणि 'अली बजरंगबली बनतो तेव्हा' गोष्टी रूपातील २ नाटके सादर केली.
असे होते मुलांचे प्रश्न
- छंद कसे व कोणते जोपासता?- सुरुवातीला करिअरमधील अडचणी काय, त्याला तोंड कसे दिले?- स्टेजवर जाण्याचा आत्मविश्वास कसा आला?- आयडॉल कोण आहे?- मालिकांमध्ये संधी कशा मिळवायच्या?- कॉमेडी अभिनय असल्यास तो कसा करता?- सुरुवातीला मानसिक आरोग्यावर परिणाम झाला का?- मला कशात करिअर करायचंय हे घरच्यांना कसे सांगायचे?- संयम कसा ठेवायचा?