पुणे : देशाला कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक रात्री टाळेबंदी जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही वाटले नाही का? रोजगार बंद, काम बंद असे असताना परप्रांतीय मजूरांना उपाशी मरू द्यायचे होते का असा संतप्त सवाल पुण्यातून काँग्रेसने केला आहे.
प्रदेश प्रवक्तेे गोपाळ तिवारी म्हणाले, संसदेतील सभागृहाचा वापर राजकीय फायद्यासाठी करण्याचा अतीशय निंद्य प्रकार भाजपाने केला आहे. देशाला कसलीही माहिती न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक टाळेबंदी जाहीर केली. सर्व चलनवलन थांबवले. अशा वेळी वास्तविक त्यांनी नागरिकांचा विचार करायला हवा होता. ते खातील काय याची काळजी घ्यायला हवी होती. ती महाराष्ट्र सरकारने घेतली. काँग्रेसने स्वखर्चाने मजूरांना तिकीटे काढून देत त्यांना त्यांच्या गावाकडे पाठवले
मोदी सरकारने मात्र रेल्वेची तिकीटे याही काळात वाढवली. काँग्रेसने स्वखर्चाने या मजूरांना तिकीटे काढून देत त्यांना त्यांच्या गावाकडे पाठवले. या काळात मोदीच कोरोना साथीवर प्रभावी उपाययोजना करायचे सोडून नागरिकांना टाळ्या व थाळ्या वाजवण्याचे आवाहन करत होते अशी टीका तिवारी यांनी केली. काँग्रेसमुळे नाही तर मोदी सरकारने अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांना भारतात बोलावून व विरोध होत असतानाही कूंभ मेळ्याला परवानगी देऊन देशात कोराना वाढवला असे तिवारी म्हणाले. देशाच्या संसदेत राजकीय भाषण करून महाराष्ट्राची व बिहार, उत्तरप्रदेशची बदनामी करणाऱ्या मोदी यांना या राज्यातील जनता कधीही माफ करणार नाही असा इशाराही तिवारी यांनी दिला.