एवढे आमदार फुटताहेत हे सत्तेत असूनही कळलं नाही का?; अजित पवारांनी सांगितलं 'तेव्हा' नेमकं काय झालं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 12:50 PM2023-02-03T12:50:21+5:302023-02-03T12:51:03+5:30

राज्यातील या ऐतिहासिक राजकीय घडमोडींबाबत आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. 

Didnt you realize that so many MLAs are breaking up despite being in power Ajit Pawar told what exactly happened in shiv sena party dispute | एवढे आमदार फुटताहेत हे सत्तेत असूनही कळलं नाही का?; अजित पवारांनी सांगितलं 'तेव्हा' नेमकं काय झालं

एवढे आमदार फुटताहेत हे सत्तेत असूनही कळलं नाही का?; अजित पवारांनी सांगितलं 'तेव्हा' नेमकं काय झालं

googlenewsNext

पुणे-

शिवसेना पक्षात अभूतपूर्व फूट पडून राज्यानं ऐतिहासिक सत्तांतर पाहिलं. नवं सरकार सत्तेत येऊन आता काही महिनेही उलटले आहेत. पण असं असतानाही सत्ताधारी पक्षाला इतक्या मोठ्या बंडाची जराशीही कल्पना नव्हती यावर अजूनही अनेकांचा विश्वास बसत नाही. राज्यातील या ऐतिहासिक राजकीय घडमोडींबाबत आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. 

आमदार फुटणार आहेत हे आधीच कळलं होतं. तसं उद्धव ठाकरेंना आम्ही कळवलं देखील होतं, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. त्यात अजित पवार बोलत होते. एवढे आमदार फुटताहेत हे सत्तेत असूनही कळलं नाही का? या प्रश्नाच्या उत्तरात अजित पवार यांनी पडद्यामागची सर्व कहाणी सांगितली. 

"दोन-तीन वेळेला तशी माहितीही मिळाली होती. पवार साहेबांनीही उद्धवजींना माहिती दिली. मीही त्यांना माहिती दिली होती. शरद पवारांनी तर बैठक देखील घेतली होती. पण उद्धव ठाकरे म्हणायचे की मला माझ्या आमदारांवर विश्वास आहे. ते इतकी टोकाची भूमिका घेणार नाहीत असं त्यांना वाटायचं. पण जो पहिला ग्रूप १५-१६ आमदारांचा गेला. त्यानंतर आमदारांना एकजुटीनं सोबत ठेवण्याची गरज होती. तशाप्रकारची गरज त्यावेळी दाखवली गेली नाही. मग मुभा असल्यासारखं तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, ज्यांना थांबायचं आहे त्यांनी इथं थांबा असं वातावरण त्यावेळी पाहायला मिळालं. आता वस्तुस्थिती काय हे त्यापक्षाचेच नेते सांगू शकतील", असं अजित पवार म्हणाले. 

"नेतृत्त्वानं आपल्या सहकाऱ्यांवर डोळे झाकून जो विश्वास टाकला. त्या विश्वासाला पूर्णपणे तडा देण्याचं काम यानिमित्तानं करण्यात आलं. काहीजण गाफील राहिले असं म्हणायला हरकत नाही", असंही अजित पवार म्हणाले. 

सहा महिनेआधीच कुजबूज कानावर होती
शिंदे गटानं बंडाचं निशाण फडकावलं त्याच्या सहा महिने आधीच माझ्या कानावर याची कुजबूज आली होती, असंही अजित पवार यांनी सांगितलं. "एकदम सुरुवातीला फार सहा महिने आधी. म्हणजे जूनच्या आधीच कुजबूज माझ्या कानावर आली होती. माझी आणि उद्धव ठाकरेंची दररोज कामानिमित्त बैठक व्हायची. त्यावेळी मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं आणि त्यांनी माझ्याही कानावर आलं आहे, मी त्यांना बोलावून त्यांच्याशी बोलून घेतो असं म्हटलं होतं. आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे त्यावर मार्ग काढतो असंही ते म्हणाले होते", असं अजित पवार म्हणाले. 

Web Title: Didnt you realize that so many MLAs are breaking up despite being in power Ajit Pawar told what exactly happened in shiv sena party dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.