लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागात दोन डॉक्टरांमध्येच बुधवारी दुपारी वादावादी झाली. काम कोणी करायचे, यावरून सुरुवातीला झालेला शाब्दिक वाद नंतर थेट एकमेकांचे कपडे धरून हाणामारी करण्यापर्यंत पोहोचला. काही जणांच्या मध्यस्थीने तो मिटला. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी नंतर दोघांनाही आपल्या दालनात बोलावून हे भांडण मिटविले.डॉ. अमित शाह व डॉ. जयंत खेडेकर यांच्यात हा वाद झाला. एका नागरिकाचे शहरी गरीब योजनेअंतर्गत टोकन (सवलत मिळण्यासाठीचे कूपन) द्यायचे काम होते. संबंधिताने उत्पन्नाचा दाखला दिला नसल्यामुळे त्यात अडचण येत होती. तो नसतानाही टोकन दिले, तर विभागप्रुखांकडून कारवाई करण्यात येते. दाखला नसतानाही टोकन द्यावे, असा आग्रह धरणाऱ्या नागरिकाबरोबर संभाषण करण्यावरून या दोन्ही डॉक्टरांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाले. प्रभारी आरोग्य विभागप्रमुख डॉ. वैशाली साबणे या वेळी उपस्थित होत्या.त्यांनाही काय करावे ते समजत नव्हते. त्यानंतर मारामारीलाच सुरुवात झाली. थोड्याच वेळात महापालिकेत सर्वत्र ही माहिती पसरली.भिमाले यांनी डॉ. संजय वावरे यांना फोन करून डॉ. शाह व डॉ. खेडकर यांना दालनात बोलावून घेतले. एलबीटी विभागप्रमुख ज्ञानेश्वर मोळक तसेच वरिष्ठ अभियंता श्रीनिवास कंदूल हेही उपस्थित होते. भिमाले यांनी माहिती घेऊन दोघांचीही समजूत घातली.शहरी गरीब योजनेअंतर्गत कामावरून आरोग्य विभागात बरेच वाद आहेत. या योजनेत शहरातील १ लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना १ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय साह्य देण्यात येते. त्यासाठी संबंधिताने उत्पन्नाचा दाखला महापालिकेत देणे बंधनकारक आहे. हा दाखला तहसीलदारांकडून देण्यात येते व तो वेळेवर मिळत नाही. दाखला नसतानाही कूपन द्या, असा आग्रह होतो व तसे केले तर आयुक्तांकडून कारवाई होते, असे या दोघांनीही सांगितले. यावर भिमाले यांनी डॉ. वावरे यांना याबाबत काय करता येईल, याची माहिती घेऊन टिपण सादर करण्याची सूचना केली. नागरिकांची कामेही झाली पाहिेजेत व त्रासही होता कामा नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.- या प्रकरणातील डॉ. अमित शाह या नावामुळे महापालिका वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. -भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नामसाधर्म्यामुळे शाह यांची दादागिरी आता इथेही सुरू झाली का असे गंमतीत बोलले जात होते.
डॉक्टरांमध्येच जुंपली
By admin | Published: June 15, 2017 5:03 AM