पेरणोली : आजरा तालुक्यातील पेरणोलीसह परिसरातील वझरे, सोहाळे, कोरिवडे, देवकांडगाव, आदी गावांत हत्तीने उसासह भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून धुमाकूळ घातल्याने पेरणोलीसह परिसरात घबराटीचे वातावरण आहे.भादवण येथील विजय गोरे यांना गंभीर जखमी केल्यानंतर पेरणोली परिसरातील सोहाळे, वझरे, कोरिवडे, देवकांडगाव या गावांकडे प्रयाण केले आहे. काल, बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भावेश्वरी व महालक्ष्मी सेवा संस्थेचे सचिव अमित सावंत कामावरून हरिजन वसाहतीमधून घराकडे जात असताना थळ देवालयाजवळ अचानक हत्ती समोर आला. सावंत यांनी गावाकडे पळ काढला. दरम्यान, सावंत यांनी प्रसंगावधान राखून ग्रामस्थांना कळविले. हत्तीने चिरकेवाडी वसाहतीमधून कोरिवडेच्या दिशेने प्रयाण केले. तत्पूर्वी ज्ञानोबा भैरू दळवी, तुकाराम भैरू दळवी यांचे एक ट्रक ऊसपिकाचे नुकसान केले आहे. मारुती बाबूराव कांबळे, पांडुरंग गुरव यांच्या भातपिकाचे, तर केशव मोहिते यांच्या भुईमुगाचे नुकसान केले आहे. सदाशिव कांबळे, अर्जुन कांबळे, संतोष नावलकर, संभाजी सावंत, आदींनी रात्री उशिरा हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भादवण येथील ताज्या घटनेने पेरणोलीमधील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनक्षेत्रपाल राजन देसाई, वनमजूर सुरेश पताडे, मारुती शिंदे यांनी हत्तीला माघारी पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. (वार्ताहर)
डिझेल चोरी पकडली
By admin | Published: August 28, 2014 11:59 PM