लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बनावट चावीच्या साह्याने डिझेल टँकरच्या व्हॉल्वचे कुलूप उघडून डिझेलची चोरी करणाऱ्या आणखी एकास लोणीकंद ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गजानन शिवाजी चिट्टे (वय २५, रा. राणी सावरगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे कोठडी सुनावलेल्याचे नाव आहे. तो टँकरचालक आहे. यापूर्वी हॉटेल चालवणाऱ्या पितापुत्रासह एका ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना फुलगाव येथील एका हॉटेलजवळ येथे २२ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. गजानन चिट्टे हा इतर साथीदारांच्या मदतीने येथील हॉटेलवर टाटा कंपनीच्या (एमएच १४/ ईएम ६७०१) डिझेलच्या टँकरमधून चोरी करून स्टॉक करताना आढळून आले. त्यांनी सुमारे ६ हजार ७०० रुपये किमतीचे डिझेल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वी अटक झालेल्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चिट्टे याला अटक करण्यात आली. त्यांनी टँकरचे व्हॉल्वचे कुलूप उघडण्यासाठी वापरलेली बनावट चावी कोठून मिळवली, त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत, यापूर्वी त्यांनी असे गुन्हे केले आहेत का, याबाबत तपास करण्यासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरत त्याला २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
डिझेल चोरीप्रकरणी चालकास अटक
By admin | Published: June 26, 2017 4:00 AM