जेजुरी : नीरा बस स्थानकात रात्री मुक्कामी असणाऱ्या एसटी बसच्या डिझेल टाकीतील डिझेल चोरणाऱ्या चार तरुणांपैकी दोघांना पोलिसांनी जेरबंद केले, तर दोघे पसार झाले. शनिवारी सातारा-नीरा बस (एम.एच.१२ सी.एच.८८८३) नीरा स्थानकात मुक्कामी होती. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चालक विष्णू आनंदा बांदल यांना बसच्या मागील बाजूस कसला तरी आवाज येत असल्याचे जाणवले. त्यांनी बस खाली उतरून पाहिले असता एक ओम्नी मारुती कार व चार तरुण बसच्या डिझेल टाकीतील डिझेल प्लॅस्टिक पाइपच्या साहाय्याने प्लॅस्टिक कॅनमध्ये काढून घेत होते. त्यांनी या तरुणांना हटकले असता त्यांनी चालकाला धमकी देत पोबारा करण्याचा प्रयत्न केला. चालकाचा आरडाओरडा ऐकून गस्तीवरील पोलिसांनी पळून जाणारी ओम्नी मारुती कार (एम.एच.१२ के.जे. ९१३) अडवून त्यातील दोघांना ताब्यात घेतले, तर दोघेजण दुचाकीवरून ३५ लिटर डिझेलच्या कॅनसह पळून गेले. पोलिसांनी अमोल प्रकाश जगताप (वय २५) व जितेश अनिल बाठे (वय १९, दोघेही रा. देवळे, ता. भोर) यांना अटक केली आहे. ओम्नी कार व ३५ लिटर डिझेलही जप्त करण्यात आले आहे. तर त्यांचे सहकारी तेजस अशोक सोळके (रा. सांगवी, ता. भोर) आणि विजय बाबूराव निगडे (रा. भोर चौपाटी) हे दुचाकीवरून पसार झाले आहेत. पोलिसांनी भादवि ३९२, ३५३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
जेजुरीत एसटी बसमधील डिझेल चोरताना दोघे जेरबंद
By admin | Published: January 05, 2015 12:17 AM