दीपक जाधव , पुणेपुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपीएमएल) ९५ टक्के बसचे स्पीडोमीटर बंद असल्याची धक्कादायक माहिती पीएमपी प्रशासनाकडून माहिती अधिकारामध्ये अधिकृतरीत्या देण्यात आली आहे. डिझेलचोरीसाठी हे स्पीडोमीटर बंद पाडले जात असून, अगदी नव्याने खरेदी केलेल्या बसचेही स्पीडोमीटर बंद स्थितीत असल्याचे उजेडात आले आहे.शहरामध्ये पीएमपीच्या मालकीच्या १२०६ बस आहेत, त्यापैकी ११०० बसचे स्पीडोमीटर बंद स्थितीत आहे. गाडी किती किलोमीटर धावली, अॅव्हरेज किती मिळतो आहे, गाडीचा वेग किती आहे, हे समजण्यासाठी स्पीडोमीटरचा उपयोग होतो. मात्र, पीएमपीच्या जवळजवळ सर्वच बसचे स्पीडोमीटर बंद असल्यामुळे याची कोणतीही नोंद पीएमपीकडे नाही. पीएमपीच्या बस दररोज किती किलोमीटर धावतात, याची माहितीच मिळत नसल्याने त्यांना किती डिझेल लागले, त्याचा अॅव्हरेज किती मिळाला, याची नोंदच ठेवता येत नाही. त्यामुळे डिझेलचोरीला मोकळे रान मिळत आहे. जुन्यासह नवीन बसचेही स्पीडोमीटर बंद असल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पीएमपीच्या बसला प्रतिलिटर ३.७५ अॅव्हरेज मिळणे अपेक्षित आहे, त्याप्रमाणे बसना अॅव्हरेज मिळतो का, याची योग्य व खरी माहितीच पीएमपीकडे नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांना मिळालेल्या माहितीतून हा प्रकार उजेडात आला आहे.
स्पीडोमीटर बंद पाडून होतेय डिझेलचोरी
By admin | Published: August 03, 2015 4:13 AM