पुणे : मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, सुनेत्रा पवार यांच्याकडे त्याचा रोख असावा अशी चर्चा आहे. ‘एकनाथ खडसे यांना मीच तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटते, तिथे जा असे सांगितले, त्यांच्या इतक्या चौकशा त्यांनी सुरू केल्या, व्यक्तिगत संपत्ती जप्त केली, की त्यांना कुटुंब चालवणंसुद्धा अवघड करून टाकलं,’ असे ते म्हणाले.
खडसे यांच्याकडून विधान परिषदेची आमदारकी परत घेणार नाही, कारण एकदा दिलेले मी परत घेत नाही, असे त्यांनी सांगितले. बारामतीमधील उमेदवारीसंदर्भात वरील वक्तव्याखेरीज ते अन्य काही बोलले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) शहर कार्यालयात पवार यांनी गुरुवारी पत्रकारांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ खडसे, राज ठाकरे अशा विविध विषयांवर संवाद साधला.
पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या पदाची प्रतिष्ठा ठेवत नाहीत, परवाच्या सभेत त्यांनी जनतेला आवाहन केले, की विरोधी पक्षाचा एकही उमेदवार निवडून देऊ नका. यापूर्वीच्या सर्व पंतप्रधानांनी विरोधकांचा सन्मान केला. ते इतके बोलत असतात, त्याऐवजी त्यांनी चीनने जे अतिक्रमण केले आहे, त्यावर काय केले, याची माहिती देशवासीयांना द्यावी. राज ठाकरे यांनी आधी भाजपविरोधात कठोर भूमिका घेतली, त्याला विरोध केला, आता पाठिंबा देत आहेत. नक्की काय आहे, ते काही दिवसांतच पुढे येईल. माजी मंत्री विजय शिवतारे यांना कोणी फोन केले असतील, तर त्यात गैर काय असा प्रश्नही पवार यांनी केला. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्येच बोलताना शिवतारे यांना लोकसभा उमेदवारी करण्याविषयी फूस लावण्यात येत होती, असा आरोप केला होता.
राज्यातील राजकीय परिस्थिती दररोज बदलत आहे, असा दावा पवार यांनी केला. ते म्हणाले, मोहिते कुटुंबीयांच्या संमतीनेच धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये येत आहेत. १४ एप्रिलला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होईल. अन्य अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ इच्छित आहेत. लोकांशी बांधीलकी ठेवायची असेल, तर आता आहे तो पक्ष बदलण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांना वाटत असेल, त्यामुळेच कशाचीही अपेक्षा न ठेवता लोक आमच्या पक्षात येत आहेत. शाहू महाराज चांगले काम करत आहेत. राजघराण्यात दत्तक घेण्याची प्रथा आजची नाही. यावर जे कोणी बोलले आहे, त्यांची मानसिकता काय आहे ते त्यावरून दिसून येते असे पवार म्हणाले.