पुणे : पीएमपीएमएलच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनाच्या फरकाची तिसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली असली; तरी पीएमपीमधून निवृत्त झालेले सुमारे दीड हजार कर्मचारी अद्यापही या फरकाच्या रकमेच्या प्रतीक्षेतच आहेत. या फरकापोटी पुणे महापालिकेच्या हिश्श्याच्या रकमेपैकी सुमारे पावणे सात कोटी रुपये महापालिकेने अद्याप दिलेले नसल्याने पीएमपी प्रशासनाकडून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप फरकाची रक्कम दिलेली नाही. दरम्यान, ही रक्कम महापालिकेकडून मिळाल्यानंतरच देणे शक्य असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या कृपेची वाट पाहावी लागणार आहे. पीएमपी कर्मचाऱ्यांंच्या २०१४ मध्ये झालेल्या सुधारित वेतन करारानुसार, दोन्ही महापालिकांनी वेतन फरकाचे २७० कोटी रुपये तीन टप्प्यांत देण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार २०१४ ते २०१५ या वर्षात ९० कोटी रुपये देण्याचा ठराव दोन्ही महापालिकांमध्ये मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पुणे महापालिका ५० कोटी, तर पिंपरी-चिंचवड महापालिका ४० कोटी रुपये देणार आहे. दोन्ही महापालिकांनी २०१४ मध्ये फरकाचे ९० कोटी रुपये दिले आहेत. तर, मार्च २०१६ मध्ये ९० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर तिसऱ्या हप्त्यासाठीही दोन्ही महापालिकांनी ९० कोटी रुपयांची तरतूद केलेली होती. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन पुणे महापालिकेने या रकमेतील ५० कोटी, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने २६ कोटींची रक्कम पीएमपी प्रशासनाकडे हस्तांतरित केली आहे. तर पुणे महापालिकेकडून अद्याप पावणे सात कोटी रुपये पीएमपीला देण्यात आलेले नाहीत. (प्रतिनिधी)
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेना वेतन फरक
By admin | Published: October 04, 2016 1:39 AM