पळसदेव : पोलीस पाटील हा पोलीस व गाव यांच्यामधील ‘दूत’ असतो. गावामध्ये एकोपा राहावा, गावात भांडणे होऊ नयेत, जातीय सलोखा राहावा यासाठी हे पद महत्त्वपूर्ण असते. परंतु नकत्याच भादलवाडी येथील ग्रामसभेत पोलीस पाटील हटाव याबाबत ग्रामसभेत मतदान करण्याची वेळ येते ही बाब दुर्दैवी आहे. पोलीस पाटील व ग्रामस्थांमध्ये मतभेदांमध्ये वाढ होत असल्याचे यातून दिसून येत आहे. त्यावर पोलीस पाटील, ग्रामस्थ व प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे.
अनेक ठिकाणी महिला पोलीस पाटील आहेत. मात्र त्यांचा कारभार त्यांचे ‘पतिराज’ पाहतात. त्यामुळे ‘महिला नामधारी... अन् पतिराज कारभारी’ अशीच परिस्थिती आहे. पोलीस पाटील व गामस्थांमधे सौहार्दपूर्ण संबंध असणे आवश्यक आहे. पूर्वी पोलीस पाटील हे पद पिढ्यानपिढ्या चालत होते. त्या वेळी पोलीस पाटील गावामध्ये भांडणे अथवा इतर काही प्रकार झाल्यावर गावामध्येच ही प्रकरणे मिटवली जात असत. त्या वेळेस ग्रामस्थही पोलीस पाटलांचे ऐकत होते. मात्र सध्या अनेक ठिकाणी पोलीस पाटील व ग्रामस्थ यांच्यामध्ये एकोपा राहिलेला दिसत नाही. जणू काही याला राजकीय किनार लागलेली आहे. गावामध्ये होत असलेले राजकारण याला कारणीभूत आहे. पोलीस पाटील यांच्या विरोधात वाढती नाराजी कारणीभूत आहे. पोलीस पाटील यांनी राजकारणविरहित काम करावे अशी लोकांची भावना असते. त्यामुळे महसूल, गृह विभाग यांनी या कामी लक्ष देणे गरजेचे आहे. पूर्वी पोलीस पाटील गावाच्या शांततामय विकासासाठी कार्यरत रहात असत. त्यामुळे त्यांना मान असे . आता मात्र ते पक्षीय राजकारणात गुतून राहत असल्याचे आढळून येत असल्याने गावकऱ्यांमध्ये त्यांच्याबाबत मान कमी झाल्याचे दिसून येत आहे.