हिंजवडी : आयटी नगरी परिसरात समावेश होत असलेल्या माण आणि हिंजवडी गावांना पाणी वाटप करण्याबाबत एमआयडीसी प्रशासन दुजाभाव करीत आहे. माण ग्रामपंचायत तीन वर्षांपासून वाढीव पाण्याच्या कोट्याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्याबाबत मात्र एमआयडीसी प्रशासन चालढकल करीत आहे, तर हिंजवडी ग्रामपंचायतीला मात्र एमआयडीसी प्रशासनाकडून तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत त्यांचा वाढीव पाणी कोटा मंजूर केला आहे.
सद्य:स्थितीत एमआयडीसीकडून माणसाठी चार लाख लिटर पाणीपुरवठा होत आहे. याठिकाणी वास्तव्यास असणारी लोकसंख्या पाहता, होणारा पाणीपुरवठा अतिशय तोकडा पडत असल्याने एमआयडीसीने माणसाठी किमान दहा लाख लिटर पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामपंचायतकडून वारंवार करण्यात येत आहे.
एमआयडीसीकडून हिंजवडीसाठी यापूर्वी चार लाख लिटर पाणीपुरवठा होत होता. तो अपुरा पडत आहे. त्यामुळे हिंजवडी ग्रामपंचायतने वाढीव पाण्याच्या कोट्याबाबत एमआयडीसीकडे मागणी केली. त्या संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार हिंजवडीसाठी दैनंदिन पाणीपुरवठा दहा लाख लिटर करण्यात आला. दरम्यान, माण ग्रामपंचायतच्या वाढीव पाणीपुरवठा मागणीबाबत अद्याप कोणताही निर्णय होत नाही.
आंदोलनाचा इशारा
माण आणि हिंजवडीसाठी वेगवेगळा न्याय दिला जात आहे. माणबाबत आडमुठी भूमिका एमआयडीसी प्रशासन घेत आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा माण ग्रामस्थांनी दिला आहे. एमआयडीसी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच निर्माण झालेल्या पाणी प्रश्नाकडे लक्ष देऊन मार्ग काढावा, अशी मागणी सरपंच अर्चना आढाव, उपसरपंच शशिकांत धुमाळ यांनी केली आहे.