पुणे : दोन काळवीटांची शिकार करणारा बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला अखेर २० वर्षांनी शिक्षा झाली आहे. जोधपूर कोर्टाने सलमानला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला असून त्याची रवानगी सेंट्रल जेलमध्ये केली आहे. सलमानला शिक्षा जाहीर झाल्यावर त्याविषयी अनेक विनोदही सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत. सलमानला झालेली शिक्षा योग्य की अयोग्य या विषयावर आम्ही काही तरुणांशी संवाद साधला.यावेळी त्याच्या चाहत्यांनी दुःख व्यक्त केले असले तरी अनेकांनी शिक्षेचे स्वागत केले आहे.
सलमानची चाहती असलेल्या प्राजक्ता हिने दोन काळवीट मारण्यासाठी पाच वर्षांची शिक्षा होणे पटत नसल्याचे सांगितले. त्याने आजपर्यंत केलेल्या चांगल्या कामांची दखल न घेता त्याला थेट तुरुंगात पाठवल्याने वाईट वाटत आहे. त्याला तुरुंगात पाठवल असलं तरी माझ्या मनात त्याची प्रतिमा खालावणार नाही,तो माझा तेवढाच लाडका असेल असंही ती म्हणाली. दुसरीकडे आदिती हिने निकाल ऐकून धन्य झाले अशी उपरोधिक प्रतिक्रिया नोंदवली आहे. माणसाला मारल्यावर नाही पण निदान काळवीटाला मारल्यावर तरी त्याला शिक्षा झाली असेही ती म्हणाली. अभिनय क्षेत्रात करिअर करत असलेल्या ओंकार याने सेलिब्रिटी म्हणून सोडून देणे चुकीचेच होते असे मत मांडले. कायदा सर्वांना समान आहे, त्यामुळे चूक केल्यावर शिक्षा व्हायलाच हवी असे नमूद केले. प्रीती म्हणाली की, शिक्षा झाल्याचे ऐकून खूप वाईट वाटले.अगदी रडू आले. प्रत्येक सुधारण्याची संधी मिळायला हवी आणि त्यासाठी सलमानची अपवाद नसावा असं मला वाटत.पूजा हिने मात्र सलमानच्या शिक्षेमुळे स्वतःला वेगळे म्हणवून घेणाऱ्या सेलिब्रिटींनी धडा घेण्याची गरज असल्याचे सांगितले.चार घटका करमणूक केली म्हणजे तुम्ही प्राण्यांचे आणि माणसांचे जीव घेऊ शकता असा गैरसमज यामुळे दूर होणार आहे असेही ती म्हणाली.