ठळक मुद्देत्याच्या वर्गमित्रांनी पुढाकार घेत व्हॉटस् अॅपवर ‘एक हात मदती’चा मोहीम उघडली.
रविकिरण सासवडे बारामती : जिवाभावाचा दोस्त नीलेश अपघातात गमवला. शर्थीचे प्रयत्न करूनही आपण नील्याला वाचवू शकलो नाही, याची खंत प्रत्येकालाच होती. त्याच्यासाठी काहीतरी करायला हवे, या जाणिवेतून ‘स्वत:चे घर बांधण्याचे त्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न आपण पूर्ण करायचे,’ असे ठरवून प्रत्येक जण कामाला लागला. रविवारी ( दि.२९ एप्रिल ) रोजी नीलेशचे प्रथम पुण्यस्मरण आहे. याच दिवशी सर्व दोस्त मंडळींनी त्याच्या घराचे बांधकाम पूर्ण करून आपल्या जिवलग दोस्ताला आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली. सोलापूर जिल्ह्यातील कळंबोली (ता. माळशिरस) नीलेश शामराव खरात येथील रहिवासी आहे. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण कळंब (ता. इंदापूर) येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात झाले. त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता. मागील वर्षी लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटण्यास गेलेल्या नीलेश शामराव खरात याचा पुणे-नगर महामार्गावर अपघात झाला. या अपघातात नीलेश गंभीर जखमी झाला. त्यामुळे तो कोमात गेला. आई-वडील आणि भाऊ शेतमजूर म्हणून राबतात. नीलेशच्या उपचारांचा खर्च मोठा होता. अशावेळी कळंब महाविद्यालयाच्या त्याच्या वर्गमित्रांनी पुढाकार घेत व्हॉटस् अॅपवर ‘एक हात मदती’चा अशी मोहीम उघडली. या मोहिमेमध्ये महाविद्यालाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गदेखील सहभागी झाला. नीलेशच्या मनमिळाऊ व मेहनती स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. या सर्वांनी आपापल्या परीने नीलेशच्या उपचारासाठी रक्कम जमवली. मात्र आठ दिवस उलटले तरी नीलेश कोमातून बाहेर आला नाही. यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचा धक्का सर्व वर्गमित्रांना बसला. आपला जिवाभावाचा दोस्त म्हणजे आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य गेल्याची प्रत्येकाची भावना झाली. नीलेशने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून उच्च शिक्षण घेतले होते. नोकरीसाठी त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले. वालचंदनगर परिसरासत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेतल्या. याचदरम्यान देहू येथील रयत शिक्षण संस्थेच्या संत तुकाराममहाराज विद्यालयात तो विनाअनुदानित तत्त्वावर नोकरीस लागला होता. वेतन बेताचेच असले तरी ‘संपूर्ण आयुष्य मातीच्या पडक्या घरात काढणाऱ्या आपल्या आई-वडिलांसाठी लहानसे का होईना चांगले घर बांधायचे,’ असे नीलेशचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने नवीन घराच्या पायाचे बांधकामदेखील पूर्ण केले होते. पैसे येतील तसे घर पूर्ण करणार, असे तो म्हणायचा. मात्र त्याचे हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच नीलेशने या जगाचा निरोप घेतला. नीलेशच्या उपचारासाठी विकास कुंभार, योगेश ढगे, मेघनाथ आवटे, कुलदीप सूर्यवंशी यांनी ‘एक हात मदती’चा मोहीम उघडली होती. मात्र नीलेशच्या मृत्यूनंतर त्याचे अपूर्ण राहिलेले घराचे स्वप्न पूर्ण करायचे त्याच्या उपचारासाठी जमवलेले पैसे घरासाठी वापरायचे. तसेच अजून पैसे लागले तर जमवायचे, असे त्याच्या मित्रांनी ठरवले. त्यासाठी एकही दिवस न थांबता प्रत्येकाने नीलेशचे घर पूर्ण करण्याची जबाबदारी उचलली. त्याच्या प्रथम पुण्यस्मरणदिनीच त्याच्या वर्गमित्रांनी नीलेशच्या घराचे बांधकाम पूर्ण केले. त्याचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान प्रत्येकालाच आहे. फक्त हे घर पाहायला आज नीलेश आपल्यात नाही, या भावनेनेच सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात.