बारामती : जिवाभावाचा दोस्त नीलेश अपघातात गमवला. शर्थीचे प्रयत्न करूनही आपण नील्याला वाचवू शकलो नाही, याची खंत प्रत्येकालाच होती. त्याच्यासाठी काहीतरी करायला हवे, या जाणिवेतून ‘स्वत:चे घर बांधण्याचे त्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न आपण पूर्ण करायचे,’ असे ठरवून प्रत्येक जण कामाला लागला. आज नीलेशचे प्रथम पुण्यस्मरण. याच दिवशी सर्व दोस्त मंडळींनी त्याच्या घराचे बांधकाम पूर्ण करून आपल्या जिवलग दोस्ताला आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली.नीलेश सोलापूर जिल्ह्यातील कळंबोली (ता. माळशिरस) येथील रहिवासी. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण कळंब (ता. इंदापूर) येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात झाले. त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता. मागील वर्षी लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटण्यास गेलेल्या नीलेश शामराव खरात अपघातात गंभीर जखमी झाला. त्यामुळे तो कोमात गेला. आई-वडील आणि भाऊ शेतमजूर म्हणून राबतात. नीलेशच्या उपचारांचा खर्च मोठा होता. अशा वेळी कळंब महाविद्यालयाच्या त्याच्या वर्गमित्रांनी पुढाकार घेत व्हॉट्सअॅपवर ‘एक हात मदती’चा अशी मोहीम उघडली. सर्वांनी आपापल्या परीने नीलेशच्या उपचारासाठी रक्कम जमवली. मात्र त्याची झुंज अपयशी ठरली.‘संपूर्ण आयुष्य मातीच्या पडक्या घरात काढणाऱ्या आपल्या आई-वडिलांसाठी लहानसे का होईना चांगले घर बांधायचे,’ असे नीलेशचे स्वप्न होते. मित्रांनी उपचारासाठी जमवलेले पैशातून त्याचे अपूर्ण राहिलेले घराचे स्वप्न पूर्ण करायचे ठरविले होते. तसेच अजून पैसे लागले तर जमवायचे, असे त्याच्या मित्रांनी ठरवले. प्रत्येकाने नीलेशचे घर पूर्ण करण्याची जबाबदारी उचलली.त्याच्या प्रथम पुण्यस्मरणदिनीच त्याच्या वर्गमित्रांनी नीलेशच्याघराचे बांधकाम पूर्ण केले. त्याचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान प्रत्येकालाच आहे. फक्त हे घर पाहायलाआज नीलेश आपल्यात नाही, या भावनेनेच सर्वांच्या डोळ््याच्या कडा पाणावतात.नीलेशने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून उच्च शिक्षण घेतले होते. नोकरीसाठी त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले. वालचंदनगरपरिसरासत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेतल्या. याचदरम्यान देहू येथील रयत शिक्षण संस्थेच्या संत तुकाराममहाराज विद्यालयात तो विनाअनुदानित तत्त्वावर नोकरीस लागला होता. वेतन बेताचेच असले तरी‘संपूर्ण आयुष्य मातीच्या पडक्या घरात काढणाºया आपल्या आई-वडिलांसाठी लहानसे का होईना चांगले घर बांधायचे,’ असे नीलेशचे स्वप्न होते.
आगळीवेगळी श्रद्धांजली : जिवाभावाच्या दोस्ताचे घर पूर्ण करून पुण्यस्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 3:49 AM