पुणे : उपमहापौर व काँग्रेसचे उमेदवार मुकारी अलगुडे, स्थायी अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्यासह विद्यमान नगरसेवक दत्ता बहिरट, राजू पवार यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारल्यावर त्यांनी भाजपाचे तिकीट मिळवले; पण फॉर्म भरण्यात चूक झाल्याने त्यांना कमळ हे चिन्ह नाकारण्यात आले़ भाजपाने त्यांना पुरस्कृत केले़ भाजपाच्या पारंपरिक मतदारांनी मत त्यांच्या पारड्यात टाकले. त्यामुळे त्यांना विजय सुकर झाला. पहिल्या फेरीपासून त्या आघाडीवर होत्या. प्रभाग ७ मध्ये चारही जागा भाजपाने जिंकून घेत संपूर्ण प्रभागावर वर्चस्व मिळविले़ पारधी समाजासाठी काम करणाऱ्या आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या राजश्री काळे यांनी पहिल्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविले़ आदित्य माळवे या तरुणाला भाजपाने प्रथम तिकीट देऊन संधी दिली़ त्याचा त्यांनी लाभ उठवत शिवसेनेचे माजी नगरसेवक विनोद ओरसे आणि विद्यमान नगरसेविका शारदा ओरसे यांचे पुत्र व राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र ओरसे यांचा पराभव केला़ मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक राजू पवार यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली. मात्र, पुढे ती त्यांना टिकविला आली नाही. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार दयानंद इरकल यांची उमेदवारी स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांना महागात पडली़ इरकल यांनी तब्बल ५ हजार २९० मते मिळविली़ त्यामुळे बोडके हे सुरुवातीला चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते़ भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे यांनी बोडके यांचा ४ हजार ९२७ मतांनी पराभव केला़ विद्यमान नगरसेविका नीलिमा खाडे यांनी शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका नीता मांजाळकर यांच्यावर ८ हजार २९० मतांनी विजय मिळवला. ऐनवेळी भाजपाचे तिकीट मिळवलेल्या ज्योत्स्ना एकबोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेमलता महाले यांच्यावर तब्बल १० हजार १०२ मतांनी विजय मिळवला. प्रभाग १६ मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान नगरसेवक; पण यंदा अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या अजय तायडे यांनाही पराभव पत्करावा लागला़ ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले़
अलगुडे, बोडके, बहिरट पराभूत
By admin | Published: February 24, 2017 3:37 AM