- निनाद देशमुखपुणे : जिल्ह्यातील अवघड शाळांचे फेरसर्वेक्षण पूर्ण झाले आहे. एकेकाळी हजाराहून अधिक शाळा अवघड क्षेत्रात मोडल्या जात होत्या. मात्र, जिल्हा परिषदेच्या विशेष समितीने केलेल्या फेरसर्वेक्षणात या शाळांचा आकडा हा ९५ वर आला आहे. ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, येत्या ७ तारखेपर्यंत यावर आक्षेप घेता येणार आहे. बदल्यांच्या भीतिपोटी शिक्षक संघटनांनी या सर्वेक्षणाला विरोध दर्शविला असून, हे सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ९३४ वरून हा आकडा ९५ वर आला कसा? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी फेरसर्वेक्षणाची मागणी केली आहे.जिल्ह्यातील अनेक तालुके हे अतिदुर्गम आणि डोंगराळ आहेत. या परिसरात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा आहेत. या शाळांमध्ये जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीत. काही शाळांमध्ये तर शिक्षकांना पायी जावे लागते. अशा दुर्गम भागातील शाळांमध्ये अनेक शिक्षक जाण्यास टाळाटाळ करतात. पुणे जिल्हा परिषदेने यावर्षी करावयाच्या बदल्यांसाठी सोपे व अवघड क्षेत्राच्या फेरसर्वेक्षणाचा निर्णय घेतला होता. हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मागील वर्षीच्या ९३४ अवघड शाळांपैकी तब्बल ८३९ शाळा वगळण्यात आल्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. याही वर्षी या अवघड शाळांच्या निश्चितीसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्य अभियंते यांच्या विशेष समिती तयार करण्यात आली होती. सर्वसाधारण बारमाही असलेले रस्ते, शाळेत पोहचण्यासाठी असलेली वाहनांची व्यवस्था, डोंगराळ परिसरातील शाळा या सारखे अनेक निकष या सर्वेक्षणासाठी समितीमार्फत ठरविण्यात आले होते. नोव्हेंबर महिन्यात अवघड शाळांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. एका महिन्यात ते पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात पसरलेले रस्त्यांचे जाळे आणि अनेक भागात आज वाहने जात असल्याने यावर्षी अवघड शाळाचा आकडा हा ९५ वर आला आहे.मागील वर्षी शिक्षक बदल्यांचा प्रश्न राज्य सरकारच्या धोरणामुळे गाजला होता. यंदाच्या वर्षीदेखील हीच चिन्हे आहेत. पुणे जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र फेरसर्वेक्षण करून नवी यादी प्रसिद्ध केल्याने जिल्ह्यात पुन्हा ५ ते ६००० शिक्षकांच्या बदल्यांची शक्यता आहे. शिक्षकांमध्ये खळबळ उडाली असून पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागील वर्षी ९३४ शाळांचा समावेश अवघड क्षेत्रांमध्ये केलेला होता. या अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये भोर, वेल्हे, जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, जुन्नर व खेड या तालुक्यांमधील डोंगरी भागातील शाळांचा समावेश होता तसेच शिरूर, इंदापूर, दौंड, बारामती, हवेली, पुरंदर या तालुक्यांमधील सार्वजनिक वाहतुकीची सोय नसलेल्या आडमार्गाच्या वाडीवस्तीवरील शाळांचा अवघड क्षेत्रामध्ये समावेश होता. मागील वर्षी अवघड क्षेत्रातील ९३४ शाळांमधील शिक्षक अधिकारप्राप्त झाल्याने सोयीच्या ठिकाणी बदलून आले आहेत. या शिक्षकांची पुन्हा नव्याने बदल्या होण्याची शक्यता आहे. डोंगरी भागात मागील वर्षी प्रशासकीय बदलीने गेलेल्या शिक्षकांना तीन वर्षांनंतर विनंतीबदलीचा मिळणारा अधिकारही या फेरसर्वेक्षणामुळे रद्द होणार आहे.अवघड शाळांच्या सर्वेक्षणाचे निकषशाळेवर जाण्यासाठी बारमाही रस्ता आहे का?, शाळेपर्यंत वाहन जाते का? नसल्यास ज्या ठिकाणापर्यंत वाहन जाऊ शकते त्या ठिकाणा पासून पायी चालत जावे लागणारे अंतर (एकरी), अंतर ३ कि.मी पेक्षा जास्त असल्यास अवघड किंवा सर्वसाधारण, डोंगर चढून जावे लागते का ? डोंगर चढून अथवा उतरून जावे लागत असल्यास अंतर, पायी जावयाच्या मार्गात सावक पुल नसलेला ओढा नदी नाला आहे का ?, होडी, लाँचची सुविधा आहे का .,शाळा महिलांसाठी प्रतिकुल आहे का ? या सारखे निषक सर्वेक्षणासाठी ठेवण्यात आले होते. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्य अभियंते यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने सर्वेक्षणासाठी गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, उपअभियंते यांनी केलेल्या अहवालानुसार या अवघड शाळा निश्चित केल्या.फेरसर्वेक्षण करा...पुणे जिल्हा परिषदेने अवघड शाळांची संख्या कमी केल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असून, प्रशासनाने पुन्हा अवघड शाळांचे फेरसर्वेक्षण करून शाळांची संख्या निश्चित करावी अशी मागणी पुणे जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी केली आहे. वास्तविक या वर्षीच्या बदल्या करण्याबाबत ग्रामविकास मंत्रालयापासून अद्याप कसलेच आदेश व त्या अवघड शाळांचे निकष बदलण्याबाबत कोणत्याच स्पष्ट सूचना नसताना जिल्हा प्रशासन कशासाठी या गोष्टी करीत आहे? अवघड शाळांची फेरसर्व्हेक्षण करून कोणावर चुकीच्या पद्धतीमुळे अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी. अन्यथा पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर व सरचिटणीस राजेश ठोबळे यांनी दिला.विभागीय आयुक्तांकडे अपीलफेरसर्वेक्षणाचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांवर होणार आहे. अवघड क्षेत्र काढून घेतल्याने बदलीपात्र शिक्षकांची संख्या वाढल्यामुळे बदल्यांमधील खो-खो पुन्हा सुरू होणार आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात बदल्यांची संख्या पाच ते सहा हजारावर पोहोचणार आहे. यामुळे विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे शिक्षक संघाच्या वतीने अपील दाखल करण्यात आले आहे.शिक्षक संघाची रविवारी सभाशिक्षक संघाने पुढील निर्णय घेण्यासाठी जिल्हा शिक्षक संघाची सभा पुण्यातील शरदचंद्रजी पवार शैक्षणिक संकुलांमध्ये रविवारी आयोजित केली आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली आहे.
वर्षभरात अवघड शाळा सोप्या! शाळांचा आकडा ९३४ वरून ९५ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 12:50 AM