मंचर : उत्पादित बटाटा पिकाला सध्या किलोला ३० ते ३५ रुपये असा भाव मिळत आहे. उत्पादन चांगले मिळत आहे. यंदा शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीचे नियोजन केले आहे. मात्र, पंजाब येथील बियाणे संपत आल्यामुळे वाण उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. पंजाब राज्यातून येणाऱ्या बियाण्याची आवक थांबली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ आठ ट्रक बटाटा वाण शिल्लक आहे. बटाटा लागवडीची तयारी करूनही शेतकऱ्यांना लागवड करता येणार नाही.
रब्बी हंगामात लवकर लागवड झालेल्या बटाटा पिकाची काढणी सध्या सुरू आहे. सुरुवातीला दहा किलोस ३५ ते ३८ रुपये असा भाव मिळाला. आताही ३० ते ३५ रुपये असा भाव मिळत आहे. शेतकऱ्यांचा कल बटाटा पिकाकडे वाढला आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांनी घाबरून लागवड केली नाही. त्यावेळेस क्विंटलला ४५०० रुपये असा भाव होता. उत्पादित बटाट्याला २० रुपये किलो असा भाव जरी मिळाला. तरी हे पीक फारसे फायद्याचे नसल्याने शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. त्यामुळे लागवड क्षेत्र घटून या हंगामात केवळ ५० टक्के बटाटा लागवड झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगाध बटाटा लागवड केली त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले आहे.
यावर्षी बटाटा वाणाला उच्चांकी ९००० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. चांगल्या बाजारभावाने शेतकऱ्यांचे भांडवल वसूल होऊन नफा शिल्लक राहिला आहे. नोव्हेंबरच्या शेवटी तेथील कोल्डस्टोरेज बंद झाली आहे. एक महिना अगोदरच बटाटा बियाणे येणे बंद झाले आहे.
सध्या बाजार समितीत केवळ आठ ट्रक बटाटा बियाणे शिल्लक असून त्यातही गुजरात येथील बटाटा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्थानिक शेतकरी हे बियाणे घेत नसल्याने त्याचे बाजारभाव ३८०० ते ४७०० रुपये पर्यंत आहे. परंतु, कमी प्रतीचा गुजरात वान असल्याने यास उत्पादन कमी येते. त्यामुळे शेतकरी तो घेत नाही. पंजाब येथील गोळी बटाटा ७००० ते ८५०० रुपये क्विंटल या भावाने विकला जातोय. या गोळी बटाट्याला खूप मागणी असून तो सध्या उपलब्ध होऊ शकत नाही. बाजार समितीत दोन खापी गुजरात येथील बटाटा सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे. पुढील पंधरा दिवस शिल्लक बियाणे विकले जाईल. दरवर्षी पेक्षा एक महिना अगोदरच मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतील बटाटा विक्री बंद होणार आहे.
कोट
बटाटा लागवड क्षेत्र ५० टक्के घटले आहे. त्यामुळे यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली. त्यांना फायदा होणार आहे. वातावरण चांगले राहिल्याने बटाटा उत्पादन वाढले आहे. शिवाय चांगला बाजारभाव मिळत असल्याने मागील ५ वर्षात पहिल्यांदाच बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित नफा शिल्लक राहणार आहे. बटाट्याचे बाजारभाव यापुढील काळात वाढलेले राहतील.
- संजय मोरे, व्यापारी मंचर बाजार समिती
कोट
यावर्षी प्रथमच गुजरात येथून बटाटा वाण विक्रीसाठी आला आहे. दोन वर्षांची तुलना करता यावर्षी विक्री कमी झाली आहे. २०१९ साली जून ते जानेवारी या दरम्यान ७०५ ट्रक वाण विक्रीसाठी आला होता. क्विंटलला १५०० ते २५०० रुपये भाव मिळाला होता. मात्र, यावर्षी केवळ ५०८ ट्रक बटाटा वाण आला आहे. पंजाब येथील वाणाला क्विंटलला ४००० ते ९००० रुपये असा भाव मिळाला. तर गुजरात येथील वाणाला ५००० ते ६००० रुपये क्विंटल असा भाव मिळाला आहे.
- देवदत्त निकम, सभापती, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती