लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे येत्या २६ सप्टेंबर रोजी प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी घेतल्या जाणाऱ्या सेट परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) डाऊनलोड करताना गुरुवारी काही विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागला. मात्र, विद्यार्थ्यांनी अर्जात भरलेले नाव अचूक पध्दतीने संकेतस्थळावर टाकल्यास हॉल तिकीट प्राप्त करून घेता येईल, असे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी एकूण ९८ हजार ३६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. विद्यापीठातर्फे एकूण १५ शहरांमध्ये २३९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असून ४ हजार ६३६ वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली आहे.
विद्यापीठातर्फे ३७ वी सेट परीक्षा घेतली जात असून सर्व विद्यार्थ्यांना २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षा १० ते १.३० या वेळेत होणार असल्याने १० वाजल्यानंतर एकाही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून परीक्षा होणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात येताना तोंडाला मास्क बांधून येणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाच्या सेट विभागाचे समन्वयक बाळासाहेब कापडणीस यांनी सांगितले.