लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना परदेशात जावे लागते. औंध परिसरात राहणाऱ्या या डॉक्टरांनी पासपोर्टसाठी अर्ज केला. तेव्हा त्यांच्यासारखेच नाव असलेल्या एकावर खिडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यांनी तो मी नव्हेच, असे सांगितले तरीही त्यांना खडकी पोलिसांकडे ना हरकत प्रमाणपत्र येईपर्यंत तुमचे चारित्र्य पडताळणी पूर्ण होऊ शकणार नाही, असे सांगितले गेले. शेवटी ते स्वत: संबंधित पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी तो मी नव्हेच असे सांगितले. त्यानंतर त्यांचे व्हेरिफिकेशन झाले. त्यानंतर पुन्हा पासपाेर्ट नूतनीकरणासाठी अर्ज केल्यावर पुन्हा तोच प्रश्न पुढे आला. पुन्हा तीच प्रक्रिया पूर्ण करायची वेळ त्यांच्यावर आली. आमच्या नावासारखी आणखी नावे आहेत, यात आमचा काय दोष अशी विचारणा ते करताना दिसतात.
चारित्र्य पडताळणीत सारखे नाव असल्याने व्हेरिफिकेशनला वेळ होत असल्याने निराश झालेल्या एका तरुणाने बुधवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात हाताची नस कापून घेऊन स्वत:ला पेटवून घेतले होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणीत नामसाधर्म्य असल्यामुळे नागरिकांना येत असलेल्या अडचणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेमार्फत नागरिकांना चारित्र्य पडताळणी करून दिली जाते. त्यात संबंधित नागरिक राहत असलेल्या पोलीस ठाण्यात त्यांची व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर पोलीस आयुक्तालयातून संबंधितांवर अन्य पोलीस ठाण्यात कोणत्या गुन्ह्याची नोंद आहे का याची पडताळणी केली जाते. त्यानंतर त्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते किंवा पासपोर्टसाठीचा त्यांचा अर्ज पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जातो. यावेळी अनेकदा शहराच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याच नावासारख्या दुस-या व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल तर त्याची माहिती पोलीस रेकॉर्डवर दिसते. त्याची संबंधित पोलीस ठाण्यातून शहानिशा केल्यावरच खात्री झाल्यानंतर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते.
----------------------
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चारित्र्य पडताळणीचे अर्ज ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र, काही अडचणी नसल्यास अनेकांना ८ ते १५ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाते. जर संबंधित नागरिकाच्या नावासारखेच नाव असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल तर, त्याची शहानिशा केल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. जेथे गुन्हा दाखल आहे, त्या पोलीस ठाण्याकडे पडताळणीसाठी माहिती पाठविली जाते. त्यांच्याकडून संबंधित नागरिक तो नाही, याचे पत्र दिल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होते. अनेकदा दिवसात ६ ते ७ असे येत असतात. काही दिवस एकही अर्ज नसतो. जर गुन्हा दाखल असतानाही प्रमाणपत्र दिले गेले तर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घ्यावी लागते. संबंधित नागरिकांची अडचण लक्षात घेऊन येथील अधिकारी, कर्मचारी सहकार्य करत असतात. मात्र, त्यांच्याही काही अडचणी असतात, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.