पुणे : जैन धर्मामध्ये ‘श्वेतांबर’ आणि ‘दिगंबर’ या पंथांच्या हस्तलिखित पोथ्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. आजपर्यंत ‘श्वेतांबर’ पंथांच्याच हस्तलिखित पोथ्यांची संदर्भ सूची तयार करण्याचे काम झाले आहे. ‘दिगंबर’ पंथीय दीड हजार पोथ्यांवर काम झालेले नसल्याने संस्थेने या पंथाची विवरणात्मक सूची करण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे.‘रामायण’, ‘महाभारत’, ‘महाकाव्य’ आणि भागवत पुराण’ ग्रंथांबरोबरच भांडारकर संस्थेतर्फे ‘न्याय आणि ज्ञानमीमांसा’ व जैन धर्मातील ‘दिगंबर’ पंथाची विवरणात्मक सूची तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. इन्फोसिस फाउंडेशनने दिलेल्या आर्थिक सहकायार्तून संदर्भ सूचीचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत, अशी माहिती संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जैनॉलॉजीचे तज्ञ डॉ. कमलकुमार जैन यांनी ही सूची तयार करण्याची तयारी दाखवली आहे.प्रकल्प प्रमुख डॉ. अमृता नातू म्हणाल्या, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या हस्तलिखित विभागामध्ये जवळपास २८ हजार हस्तलिखित पोथ्या आहेत. काही विषयांच्या सूची करण्याचे काम अजूनही झालेले नाही. ते संस्थेने हाती घेतले आहे. ‘न्याय व ज्ञानमीमांसा’ या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. देवदत्त पाटील आणि अपर्णा पाटील आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत नायक आणि रोहन कुलकर्णी सहाय्यक संशोधक म्हणून कार्यरत आहेत.हस्तलिखित ग्रंथालयात पाच हजार पोथ्या जैन धर्म आणि प्राकृत भाषेशी संबंधित आहेत. साडेचार हजार पोथ्या ‘श्वेतांबर’ पंथीय, आगम आणि इतर ग्रंथांशी संबंधित आहेत. या पोथ्यांची विवरणात्मक सूची उपलब्ध आहे. सन १९९०मध्ये हे काम करण्यात आले होते.‘न्याय’ म्हणजे प्रमाणशास्त्र. यात विविध प्रमाणांचा अभ्यास केला जातो. मीमांसा हे शास्त्र आहे, ज्यात यज्ञ, यज्ञविषयक ग्रंथ, वेदांचा यज्ञविषयक अर्थ यांचा अभ्यास केलेला आढळतो. या दोन शास्त्रांच्या पोथ्यांची सूची आम्ही करीत आहोत. यामधून काही नवीन ग्रंथ आणि पोथ्या उजेडात येण्याची शक्यता आहे. या विवरणात्मक सूचीमुळे संशोधकांना प्रत्येक पोथीची सविस्तर माहिती मिळू शकेल.- डॉ. श्रीकांत बहुलकर, मानद सचिव - भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था
‘दिगंबर’ पंथीय १५०० पोथ्यांची येणार संदर्भ सूची; २८ हजार हस्तलिखित पोथ्या उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 2:44 AM