लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड /गराडे : श्री क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.२८) दत्त जन्म सोहळा ७ वाजुन ३ मिनिटांनी उत्साहात व गर्दी टाळत पार पडला. या दत्त जयंती सोहळ्यासाठी दरवर्षी अनेक राज्यातुन लाखो भाविकांनी हजेरी लावतात. पण या वर्षी मात्र कोरोना रोगाच्या प्रार्दुभाव पहाता मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी दिगंबरा..दिगंबराच्या जयघोषाने नारायणपुर नगरी दुमदुमून गेली होती.
दत्त जन्मावेळी वैभवकाका काळे यांचे आख्यान, नाव ठेवणे, पाळणा, पुष्पवृष्टी, देवभेटविणे, सुंठवडा वाटप आदी कार्यक्रम झाले. मंदिरात फुलांची सजावट, विद्युतरोषणाई, रांगोळ्या काढुन मंदिर सुशोभित करण्यात आले होते.
सोमवारी जयंतीचा मुख्य दिवस असल्याने सकाळी ९ ते ११ या वेळात महापूजा, आरती आदी धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी पादुकांना अभिषेक व त्यानंतर भजनाचा कार्यक्रम मुख्य मंदिरात झाला. त्यानंतर वैभवकाका काळे यांचे जन्माख्यान होऊन सायंकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी दत्त जन्म झाला. याप्रसंगी आमदार संजय जगताप, माजी खासदार अशोक मोहोळ, उल्हास पवार, पी. डी. पाटील, वीरेन जैन, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, प्रशासकीय अधिकारी वैशाली इंदानी, हनुमंत गायकवाड, देवस्थानचे भरतनाना क्षीरसागर आदी उपस्थित होते.
चौकट
आज होणार चंद्रभागा स्नान
मंगळवारी (दि २९) जयंती सोहळ्याचा अखेरचा दिवस असून शाही मिरवणुकीने श्री दत्तात्रयांच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा, मूर्तींना चंद्रभागा स्नान आदी विधी पार पडल्यानंतर तीन दिवस चाललेल्या या सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती देवस्थानकडून देण्यात आली.
फोटोओळ : नारायणपुर (ता. पुरंदर) येथे दत्त जन्म प्रसंगी पाळणा हलविताना मान्यवर व शेजारी सदगुरु नारायण महाराज