पिंपरी : पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून वाद होऊन पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. तसेच कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत आदेश दिले.
अनिल संपत निरवणे तसेच संदीप आहासाहेब खांबट असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. अनिल निरवणे हे दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांचे एका पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, त्यांच्यात अंतर्गत वादविवाद झाले. त्यातून चिडून निरवणे यांनी संबंधित उपनिरीक्षक महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी देत दिघी पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना एक जानेवारी रोजी घडली. त्याबाबत १८ जानेवारी रोजी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दिघीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्याबाबत वरिष्ठांकडे अहवाल सादर केला. त्यानुसार पोलीस आयुक्त यांनी अनिल निरवणे यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
संदीप खांबट हे चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पोलिसांच्या वन मोबाईल वाहनावर त्यांची चालक म्हणून नियुक्ती केली होती. दरम्यान १३ जानेवारी रोजी कर्तव्यावर असताना खांबट यांनी मद्यपान केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांची ब्रिथ अनालायझर टेस्ट केली असता त्याचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांची पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ड्रंक अॅंड ड्राईव्हचा खटला दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.