पुणे : सध्याचे युग हे ’डिजिटल’ तंत्रज्ञानाचे आहे. चित्रपटांचे डिजिटलायझेशन करण्याबरोबरच आता जागतिक चित्रपटसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘डिजिटल लायब्ररी’ ची संकल्पना पुण्यात साकारण्याकरिता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने (एनएफएआय) पावले उचलली आहेत. संस्थेच्या परिसरातील हेरिटेज वास्तू असलेल्या ‘जयकर बंगल्यामध्ये’ या लायब्ररीला मूर्त रूप दिले जाणार आहे. या हेरिटेज वास्तूमध्ये कोणतेही बदल न करता तिला ‘डिजिटल लायब्ररी’चा टच दिला जाणार आहे. संशोधकांना उपयुक्त ठरेल अशा माध्यमातून साकार होत असलेल्या या वास्तूच्या नूतनीकरणाला सुरूवात झाली असून, लायब्ररीचा प्रकल्प पूर्ण होण्यास डिसेंबर २०१७ चा काळ उजाडणार आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू मुकुंद रामराव जयकर हे (१९४८-१९५३) या बंगल्यामध्ये वास्तव्यास होते. या बंगल्याचे संपूर्ण स्ट्रक्चर हे लाकडी प्रकारात असून, ब्रिटीशकालीन स्थापत्यशास्त्राप्रमाणे त्यांनी ही वास्तू बांधली होती. अनेक वर्षांपासून ऐतिहासिक ठेवा म्हणून ही वास्तू जतन करण्यात येत आहे. याच वास्तूमध्ये संशोधकांना अभ्यासासाठी उपयुक्त अशी लायब्ररी तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली असल्याची माहिती एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. ते म्हणाले, या वास्तूमध्ये डिजिटल लायब्ररी करण्याची परवानगी मिळावी यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेच्या हेरिटेज सेलला मार्च २०१५ मध्ये देण्यात आला होता. हेरिटेज कमिटीने पाहाणी करून त्याला फेब्रुवारी २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली. या हेरिटेज वास्तूला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. यासाठी पुरातत्व खात्याच्या अधिका-याचेही सहकार्य घेण्यात आले असून, वास्तूच्या नूतनीकरणाचे काम सवाणी फर्मसला दिले आहे. (प्रतिनिधी)
‘जयकर’मध्ये ‘डिजिटल लायब्ररी’
By admin | Published: November 08, 2016 1:28 AM