पुणे : भारतात सर्वाधिक डिजिटल पेमेंट होत आहे. हे प्रमाण जगात आपलेच अधिक आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंटच्या प्लॅटफॉर्मला अधिक सुरक्षित करण्यासाठी खास पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. त्याचीच चर्चा साेमवारपासून (दि.१२) होत असलेल्या तिसऱ्या डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपच्या परिषदेत होणार असल्याची माहिती मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्फॉरमेशन टेक्नॉलाजीचे (एमईआयटीवाय) सचिव अल्केश कुमार शर्मा यांनी आज (दि.११) दिली.
यावेळी एमईआयटीवायचे सहसचिव सुशील पाल, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते. ‘जी २०’ परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यातंर्गत देशभरात विविध ठिकाणी परिषदेच्या बैठका होत आहेत. आर्थिक विषयावरील बैठक पुण्यात १२ ते १४ जून दरम्यान होत आहे. त्यामध्ये काय विषय असणार त्याची माहिती आज देण्यात आली.
शर्मा म्हणाले,‘‘ जी २० मध्ये यंदा प्रथमच आपण स्टार्टअपचा समावेश करण्यात आला आहे. कारण आपल्या देशात हे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. म्हणून स्टार्टअपचा समावेश परिषदेमध्ये असणार आहे.तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या विषयावर देखील चर्चा होणार आहे. ’’भारतात डिजिटल करन्सीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. भारतात सुमारे ७० टक्के डिजिटल करन्सीचा वापर होत आहे. हा जगामध्ये सर्वाधिक आहे. परंतु, काही देशांमध्ये मात्र त्याला विरोध होत आहे. कारण त्या देशांमध्ये गरीब आहे. तिथे अजूनही डिजिटल कऱन्सीबाबत जनजागृती नाही. तेवढी सक्षमता नाही. त्याविषयी जी २० अंतर्गत जागतिक स्तरावर जनजागृतीला सुरवात केली आहे.
परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्टक्चर उभा करण्यासाठी चर्चा होईल. कारण सध्या सर्वत्र डिजिटल पेमेंटचा वापर होतो. त्यामध्ये सायबर सिक्युरिटीची समस्या भेडसावत आहे. त्यावर उपाय करण्यासाठी आपले डिजिटल पब्लिक इन्फ्रास्टक्चर सक्षम असणे आवश्यक आहे. त्याविषयी परिषदेत चर्चा करून नियमावली आणि इतर बाबींवर विचार व्यक्त होतील.
आपल्या देशात डिजिटल स्किल्स टूल्स विकसित केले जात आहेत. त्यामुळे जगाला आपण त्याविषयी मार्गदर्शन करू शकतो. इतर देशांमध्ये या स्किलचे मनुष्यबळ कमी आहे. त्यांना आपण ते पुरवू शकतो. कारण आपण डिजि लॉकर, आधार, युपीआय आदी सर्व गोष्टींवर काम केलेले आहे. म्हणून आपण यामध्ये जगाचे नेतृत्व करू शकतो. डिजिटली करन्सी करताना काय काळजी घ्यावी यावर देखील ‘स्टे सेफ ऑनलाइन’ अशी एक मोहिम राबविली जात आहे. त्यातून आपल्याला डिजिटली सुरक्षितता मिळू शकते. विक्रम कुमार म्हणाले,‘‘ पुणे हे इनोव्हेशनसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुण्यात ही परिषद होत असल्याचा आनंद आहे. या परिषदेच्या वेळीच पालखी सोहळा शहरात येत आहे. तो सोहळा परदेशी पाहुण्यांना देखील पहायचा आहे. ते याविषयी उत्सुक आहेत. या परिषदेसाठी महापालिकेने सर्व तयारी केली आहे.’’