पुणे: राज्य शासनाच्या महसूल विभागातर्फे डिजिटल सातबारा उतारे तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात असून आत्तापर्यंत ३१ लाख ३३ हजार डिजिटल उतारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मोबाईलवरही ही सुविधा उपलब्ध असून येत्या १ आॅगस्टपर्यंत उतारे डाऊन लोड करण्याची सुविधा मोफत आहे.तसेच राज्यातील सव्वा लाखाहून अधिक नागरिकांनी डिजिटल सातबारा डाऊनलोड करून घेतले आहेत. शेतक-यांना व सर्व सामान्य नागरिकांना सातबारा उतारा मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयात फे-या माराव्या लागतात. मात्र, राज्यातील ४३ हजार ९४६ गावांपैकी ४१ हजार ७७ गावांचे सातबारा दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. राज्य शासनाने ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सर्व जमिनींचे डिजिटल सातबारा उतारे आॅनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे. चावडी वाचनानंतर ३५७ तालुक्यांपैकी २९१ तालुक्यात प्रख्यापण पूर्ण झाले असून डिजिटल स्वाक्षरीचे काम सुरू आहे.राज्यात ३१ लाख ३३ हजार डिजिटल स्वाक्षरी सातबारा उतारे तयार करण्यात आले असून आत्तापर्यंत १ लाख २७ हजार नागरिकांनी हे उतारे डाऊनलोड करून घेतले आहे.राज्यात रत्नागिरी, सिंधूदूर्ग व पुणे जिल्ह्याचे काही तालुक्यांचे काम मागे आहे.मात्र,या कामांची गती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येत्या आॅगस्ट महिन्यापर्यंत अडीच कोटी उता-यांचे काम पूर्ण करायचे उद्दीष्ट आहे. त्याचप्रमाणे आॅगस्टपर्यंत डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करण्याची सुविधा मोफत उपलब्ध आहे. नागरिकांनी मोबाईलवर संबंधित संकेतस्थळावर जिल्हा, तालुका, गाव आणि सर्व्हेनंबर किंवा गट नंबर निवडला की सातबारा उतारा डाऊन लोड होतो, असे राज्याचे ई-फेरफार प्रकल्पाचे समन्वयक रामदास जगताप यांनी सांगितले.-------------------------------- जिल्हानिहाय डिजिटल सातबारा उता-याची माहिती उस्मानाबाद-२,६०,४९०, जालना-१,७३,९७५,नांदेड-३,०१,६८३, हिंगोली-९३,८४०,अकोला-१,६३,४८६, यवतमाळ-२,३४,५३८, बीड-१,३८,२८८,वाशिम-७३,००६,बुलढाणा-१,६१,१३३,अहमदनगर-३,५७,७८८, अमरावती-१,६४,७४५, परभणी-४८,०११,लातूर-५८,६६५ , रायगड-१,९०,८०२, गोंदिया-८६,१५४, सांगली- ९३,९४८, सोलापूर -१,२७,३८०, नंदूरबार-३४,४९९,औरंगाबाद-२५,८६०, वर्धा-३५,३१७, भंडारा-३८,८१५, पुणे -७२,९३५ ,नाशिक ५७,००८,जळगाव- ५२,१८७, कोल्हापूर-३९,६२६, नागपूर-२२,८७६, गडचिरोली-९,४४७, चंद्रपूर-७,५५४, ठाणे-४,६९८,पालघर-२,७४३,सातारा-१,६२३, धुळे-१८८---------------
मोबाईलवर मिळतोय डिजिटल सातबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:56 PM
राज्य शासनाने ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सर्व जमिनींचे डिजिटल सातबारा उतारे आॅनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे.
ठळक मुद्देनागरिकांकडून प्रतिसाद : सव्वालाखाहून अधिक सातबारा डाऊनलोड राज्यातील ४३ हजार ९४६ गावांपैकी ४१ हजार ७७ गावांचे सातबारा दुरूस्तीचे काम पूर्ण राज्यात रत्नागिरी, सिंधूदूर्ग व पुणे जिल्ह्याचे काही तालुक्यांचे काम मागे