पुणे - ‘विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण द्यायचे असेल तर शिक्षकांना अधिक स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. म्हणूनच शिक्षकांना मानसन्मान मिळाला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे डिजिटल अध्ययन भावी काळात अपरिहार्य आहे. अशा काळात समान पुस्तके, समान परीक्षा यांची गरज राहणार नाही,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी आणि आबासाहेब अत्रे दिन प्रशालेस ९० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, संजीव ब्रह्मे, संजीव महाजन, मुख्याध्यापिका उज्ज्वला नवले, रवी चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी गुरुवर्य आबासाहेब अत्रे यांच्या कारकिर्दीवरील ‘शाळा एके शाळा’ या ग्रंथाचे तसेच लघुपटाचे प्रकाशन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या माजी शिक्षक, विद्यार्थ्यांचाही सत्कारही यानिमित्ताने करण्यात आला.केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून संपर्क साधत, ‘मातृभाषा, तसेच भारतीय भाषांमध्ये अधिकाधिक शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन करत संस्थेच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका उज्ज्वला नवले, सचिव सुधन्वा बोडस यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी आबासाहेब अत्रे यांच्यावरील लघुपट दाखविण्यात आला. प्राची मोडक यांनी सूत्रसंचालन केले.इंग्रजीच्या न्यूनगंडातून बाहेर या : नितीन करमळकरडॉ. नितीन करमळकर यांनी ‘मराठी माध्यमातून शिकणा-या मुलांना वा त्यांच्या पालकांना इंग्रजी येत नाही, या न्यूनगंडातून बाहेर येण्याची अपेक्षा व्यक्त केली. इंगजी येत नाही म्हणजे आपली प्रगती नाही, असे न मानता मातृभाषेत शिक्षण घेऊनही यशस्वी होता येते, हे व्यक्तिगत जीवनातील काही प्रसंगांचे उदाहरण देऊन त्यांनी पटवून दिले.’डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, ‘शाळेत आल्यावर मला आई-आबांचे अस्तित्व जाणवते. येथे शिकताना वडिलांनी त्यांच्या मुली म्हणून कोणतीही सवलत न देता इतर विद्यार्थ्यांच्याबरोबरीनेच वागणूक मला व बहिणीला दिली.’
डिजिटल अध्ययन अपरिहार्य -डॉ. रघुनाथ माशेलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 3:34 AM