----------------------
‘संगीत नसेल तर जीवनाला कधीच सौंदर्य आणि संस्कृती प्राप्त होणार नाही व ते वैराण बनेल. भारतीय संस्कृतीत संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संगीत हे आपल्या जीवनाचे अविभाज्य रूप आहे. त्यामुळेच संगीताची सेवा आणि श्रवणसुद्धा जीवनास अर्थ प्राप्त करून देते. निसर्गाच्या प्रत्येक बदलात, आपल्या सुख-दु:खाबरोबर संगीत असते. संगीताचे हृदयाशी नाते आहे. ज्याला संगीताची ओढ अथवा आवड नाही, तो दुदैवी म्हटला पाहिजे. माझ्या लहानपणी मी गंगूबाई हनगल, हिराबाई बडोदेकर, अमीर खाँ आदी कलावंतांचे गायन ऐकले आहे. त्या वेळी समाजाचा दर्जा हा संगीताचा त्याच्यावर किती प्रभाव आहे यावर मानला जाई.
काळाबरोबर नवीन तंत्र आले, संगीतातही बदल झाले, अनेक गोष्टी आपण आयात केल्या. सध्याचे चित्रपट संगीताचे वर्णन केवळ गोंगाट या शब्दांत करता येईल. पण हेही येथे सांगितले पाहिजे, की संस्कृती आयात करता येत नाही. हिंदुस्थानी संगीत, त्याचे प्रकार त्याच्या विविधरंगी छटा असे त्याचे स्वरूप आहे. ते कायम ठेवण्याची आज गरज आहे. संस्कृतीबरोबर असलेली ही संगीताची लय बिघडता कामा नये.’
(सदर मजकूर व छायाचित्र पुण्यातील गानवर्धन संस्थेचे माजी कार्याध्यक्ष प्रसाद भडसावळे संपादित 'संगीतसंवर्धक' स्मरणिकेतील आहे.)