मंचर (पुणे): राज्यात आता आपले सरकार नाही. विकासकामांचा ओघ सुरू राहण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती ताब्यात असली पाहिजे. आगामी सर्वच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली कामगिरी व्हावी, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा मंचर येथील शरद पवार सभागृहात पार पडला. त्यावेळी वळसे पाटील बोलत होते. ते म्हणाले, मागील पंचवीस - तीस वर्षांपासून कार्यकर्ते व सर्वांनीच मनापासून प्रेम केले आहे. त्यामुळेच सात वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यासाठी कार्यकर्ते, नागरिक, मतदार यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे सांगून वळसे पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आजपासून संपर्क मोहीम सुरू करावी. नागरिकांच्या अडचणी, शिल्लक प्रश्न प्रमुख कार्यकर्त्यांनी समजून घ्यावेत. अनेक विकासकामे झाली आहेत. कामाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी लक्ष दिले पाहिजे.
काही कळायच्या आत आघाडी सरकार जाऊन दुसरे सरकार सत्तेवर आले. त्यासाठी केंद्राने मोठी ताकद लावली, असे सांगून वळसे पाटील म्हणाले, लोकांची मने बिघडविण्याचे काम भाजप करीत आहे. महागाई व इतर प्रश्न बाजूला पडून दुसरेच प्रश्न निर्माण केले जात आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापल्या गावात जाऊन काम करावे. इच्छुक उमेदवारांनी शिष्टमंडळ आणून ओढाताण करू नये. इच्छुकांनी पक्ष कार्यालयात उमेदवारी अर्ज जमा करावा व निरोपाची वाट पाहावी, असे ते म्हणाले. राज्यात सरकार आपले नाही. विकासकामांचा ओघ सुरू राहण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती ताब्यात असली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी सभापती देवदत्त निकम, विष्णू काका हिंगे, संजय गावारी, सुहास बाणखेले, क्रांती गाढवे, नंदा सोनावले, उषा कानडे, रूपा जगदाळे, सुभाष मुरमारे यांची भाषणे झाली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, संचालक प्रदीप वळसे पाटील, अंकित जाधव, भगवान वाघ, सुषमा शिंदे, गणपत इंदोरे, अजय आवटे, कैलासबुवा काळे, शरद शिंदे, अरविंद वळसे पाटील, अजय घुले, भगवान वाघ आदी उपस्थित होते. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले तर अरुणा थोरात यांनी आभार मानले.