पहाटेच्या शपथविधीनंतर दिलीप-वळसे पाटलांनी अजित पवारांचे मन वळवले होते, आणि आता...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 06:02 PM2023-07-02T18:02:35+5:302023-07-02T18:03:13+5:30
शरद पवारांचे कट्टर समर्थक दिलीप वळसे पाटील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ हा अनेकांसाठी धक्का
मंचर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच मर्जीतले समजले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत घेतलेली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ हा अनेकांसाठी धक्का आहे. तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच वळसे पाटील यांच्या जवळचे नेतेही याबाबत अनभिज्ञ होते. बातम्यामधून सर्वांना मंत्रिपद मिळाल्याची माहिती झाली. शरद पवार यांनी मुक संमती दिल्यानंतरच वळसे पाटील यांनी शपथ घेतली असेल अशीही चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व वळसे पाटील यांचे संबंध संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर वळसे पाटील यांनी राजकारणात प्रवेश करून प्रथम विधानसभा निवडणूक लढवली. तेव्हापासून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच मर्जीतले म्हणून वळसे पाटील ओळखले जातात. तीन वर्षांपूर्वी जेव्हा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी पवार यांचे मन वळविण्यात वळसे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शरद पवार यांचे विश्वासू म्हणून वळसे पाटील यांनी अनेक ठिकाणी जबाबदारी पार पाडली आहे. राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेते म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.मात्र आज त्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
वळसे पाटील पवार यांची साथ कदापि सोडणार नाही. असे राष्ट्रवादी बरोबरच विरोधी पक्षातील कार्यकर्तेही ठासून सांगत होते. मात्र अजित पवार यांच्या सोबतीने जात त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हे अनपेक्षितपणे घडले आहे. वळसे पाटील यांचे जवळचे कार्यकर्तेही अनभिज्ञ होते. याची साधी कुणकुणही कुणाला नव्हती. सकाळी 11 पर्यंत कुठलाही मगमुस नव्हता. मात्र काही वेळेत वळसे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वांना धक्का बसला.
शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली नसली तरी पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपून राहिली नाही. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे सुद्धा अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असलेले आढळराव पाटील यांच्या काळजीत अजून भर पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मनोमन सुखावले आहेत. कारण आजच्या घडामोडीमुळे शिंदे गटाचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. तालुका भाजपची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. राज्यातील या घडामोडीमुळे आंबेगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. मात्र तालुक्याला पुन्हा एकदा मंत्रीपद मिळाल्याने विकास कामांना चालना मिळेल असा विश्वास सर्वांनाच वाटतो. आता वळसे पाटील यांना कोणते खाते मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. वळसे पाटील तालुक्यात आल्यानंतरच अनेक गोष्टी समजणार आहे.