पुणे - अजित पवार गटात सामील झालेले दिलीप वळसे-पाटील यांनी थेट शरद पवारांवर टीका केली. जनतेनं एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केले नाही, असे वळसे-पाटील रविवारी एका कार्यक्रमात म्हणाले. या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि कार्यकर्ते वळसे पाटलांवर टीका करत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही वळसे पाटलांवर बोचरी टीका केली. त्यानंतर, वळसे पाटील यांनी आपल्या विधानाचं खापर मीडियावर फोडलं.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर दिलीप वळसे-पाटील सध्या अजित पवारांसोबत गेले आहेत. शरद पवारांचे अतिशय विश्वासू मानले जात होते. तरीही त्यांनी शरद पवारांवर इतकी बोचरी टीका केल्याने शरद पवार समर्थक चांगलेच संतापले. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिलीप वळसे-पाटील यांना प्रत्युत्तर दिले होते. आता, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं वळसे पाटील यांनी म्हटलं.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. माझं संपूर्ण भाषण ऐकलं तर मी पवार साहेबांबद्दल असं काही बोललो नाही. पवार साहेबांनी ४० ते ५० वर्ष आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी काम केलं. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातील अनेक प्रादेशिक पक्ष आपल्या हिमतीवर बहूमत मिळवून सत्तेवर बसतात. परंतु महाराष्ट्रातील जनतेने अशी शक्ती पवार साहेबांसोबत उभी केली नाही, याची मला खंत आहे, आणि ती खंत मी व्यक्त करत होतो, असे स्पष्टीकरण वळसे पाटील यांनी दिलं आहे. तसेच, पवार साहेबांना कमी लेखण्याचा किंवा पवार साहेबांना चुकीचं काही बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले. राजकीय नेत्यांच्या नेहमीच्या सोयीस्कर स्पष्टीकरणानुसार त्यांनी आपल्या विधानाचे खापर मीडियावर फोडले.
काय म्हणाले होते वळसे-पाटील
शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही, असे आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले. तसेच, ईडीवरून होत असलेल्या टीकेला दिलीप वळसे-पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच कोणाला नोटीस सापडली तर आमदारकीचा लगेच राजीनामा देईल, असे चॅलेंज देखील त्यांनी यावेळी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस आमचीही - वळसे पाटील
भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय हा एकटे अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांचा नाही, तर बहुसंख्य आमदार व पक्षातील कार्यकर्त्यांचा आहे. या संदर्भात शरद पवार यांच्याशी दोनवेळा चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी नाही म्हणून सांगितले. आपण भाजपत गेलेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आपला पक्ष असून, आपण पक्षातच आहोत, असे सांगून वळसे पाटील म्हणाले, आता निर्णय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची व आपलीही आहे. अंतिम निर्णय निवडणूक आयोग देणार आहे. आपल्या पक्षाला किती पाठिंबा आहे, हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे.
वळसे पाटील कृतघ्न - आव्हाड
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वळसे पाटील यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. "हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले.साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार,साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही,याच आश्चर्य वाटते. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार नाही निवडून आणू शकले" अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे.