पुणे: केंद्र राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला वेगवेगळ्या एजन्सीचा वापर करून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार सध्या सुडबुद्धीने वागत आहे, हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. केंद्राने कितीही त्रास देऊन सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी महाविकासआघाडीचे सरकार 5 वर्ष पूर्ण करणारच आणि जे त्रास देत आहेत, त्यांना आम्ही पुरून उरणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिली वळसे पाटील (Dilip Walase patil) यांनी सांगितले. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील कळंब-चांडोली झेपी गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील बोलत होते.
मागील काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकार बऱ्याच मुद्द्यावर एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. सध्या राज्यात गाजत असलेले आर्यन खान आणि समीर वानखेडेप्रकरणीही राज्यात मोठा गोंधळ दिसत आहे. 'सध्या राज्यात मराठा, धनगर आणि अल्पसंख्याक समाजांची आरक्षणाची मागणी वाढत आहे. या समाजांच्या मागणीला राज्य सरकारमधील प्रत्येक पक्षाचा पाठींबा आहे. तर दुसऱ्याबाजूला भाजप मुद्दामपणे राज्य सरकारला या मुद्द्यांवरून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही दिलीप वळसे-पाटलांनी यावेळी बोलताना केला.
येणाऱ्या झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा जिंकायच्या आहेत, त्यामुळे सध्या विरोधकांपेक्षा आपल्यातील काही नाराजांचीच भीती आहे, असं वक्तव्य पाटील यांनी केले. विधानसभा निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रवादीला मतदान झालं तसंच मतदान आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत झालं पाहिजे. निर्वाचित लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील जनतेसाठी लोकोपयोगी कामं केली पाहिजेत, अशी अपेक्षाही पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.