मंचर : आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील सलग सहाव्यांदा विजयी झाले असून, विजयाचा षटकार त्यांनी मारला आहे. वळसे पाटील यांनी शिवसेनेचे अरुण गिरे यांचा तब्बल ५८ हजार १५४ मतांनी पराभव केला. शिवसेनेचा दारुण पराभव झाला असून, भाजपा व काँग्रेस उमेदवारांना सन्मानजनक मतेही मिळविता आलेली नाही. विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांनी सलग सहाव्यांदा विजय संपादन करून एक विक्रम केला आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी चढत्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे यांचा तब्बल ५८ हजार १५४ मतांनी पराभव केला आहे. वळसे पाटील यांना १ लाख २० हजार २३५ मते मिळाली, तर शिवसेनेचे अरुण गिरे यांना ६२ हजार ८१ मतांवर समाधान मानावे लागले. गिरे यांच्यापेक्षा वळसे पाटील यांनी दुपटीने मते मिळविली आहेत. भाजपा उमेदवार जयसिंग एरंडे यांना ४ हजार ६१५, तर काँग्रेस उमेदवार अॅड. संध्या बाणखेले यांना केवळ २ हजार ४०८ मते मिळाली आहेत. आज सकाळी ६ वाजता येथील क्रीडा संकुलमध्ये मतमोजणीचा प्रारंभ झाला. एकावेळी २०० यंत्रांची मोजणी केली जात होती. पहिल्या फेरीपासून वळसे पाटील यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली व प्रत्येक फेरीत ती वाढतच गेली. पश्चिम अदिवासी पट्टा शिरूर तालुक्याची आंबेगावला जोडलेली ३९ गावे येथे वळसे पाटील यांनी सर्वाधिक मते घेतलीच; पण शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मंचर व परिसरातील गावांमध्ये वळसे पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. मंचर शहरात प्रथमच राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. काही मोजक्या गावांमध्ये शिवसेनेला किरकोळ स्वरूपाची आघाडी मिळाली असली तरी बहुतेक गावांमध्ये राष्ट्रवादीची आघाडी वाढतच गेली. उमेदवार गिरे यांच्या गावात वळसे पाटील यांनी मताधिक्य मिळविले आहे. शिवसेनेचा एकही गड शाबूत राहिला नाही. बारा वाजता मतमोजणी संपल्यानंतर वळसे पाटील मतमोजणी केंद्रावर आले तेव्हा कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत कल्याण पांढरे यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र वळसे पाटील यांना दिले. मतमोजणी केंद्रामध्ये राष्ट्रवादी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मताधिक्यात वाढ होताच एकमेकांना शुभेच्छा देत झाली का नाही अशी चर्चा ते करत होते. शिवसेनेचे कार्यकर्ते शेवटपर्यंत थांबले; पण निकाल स्पष्ट होताच त्यांनी निघून जाणे पसंत केले.
दिलीप वळसे पाटील यांचा षटकार
By admin | Published: October 20, 2014 2:19 AM