डिंभे: साडेतेरा टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे डिंभे धरण १०० टक्के भरले असून, धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून ५००० क्युसेक एवढ्या गतीने पाणी बाहेर सोडण्यात येत असून, धरणाची पाणीपातळी वाढल्यास अधिक जलद गतीने पाणी बाहेर सोडण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणात अतिशय जलद गतीने पाणी जमा होत आहे. काल ९८ टक्के असणारा पाणीसाठा आज १०० टक्के झाल्याने दुपारी तीन वाजता धरणाचा पहिला दरवाजा उघडण्यात आला. तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाचे प्रमाण वाढल्याने आज दिवसभर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढू लागल्याने संध्याकाळी पाच वाजेपर्यंत धरणाचे पाचही दरवाजे उघडावे लागले आहेत.
सध्या धरणाची पाणीपातळी ७१९.०९० एवढी कायम ठेवण्यात आली असून काल आणि आज पाणलोट क्षेत्रात जवळपास ३६ मी. मी. एवढा पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षी २३ सप्टेंबर रोजी धरण शंभर टक्के भरले होते. त्या तुलनेत यंदा दहा दिवस आधी धरण भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत ८४२ मी. मी. एवढा पाऊस झाला आहे.
"धरणात जलद गतीने पाणी जमा होत आहे. यामुळे आम्ही सकाळपासूनच धरणाच्या पाणीपातळीत लक्ष ठेवून होतो. पाणी सोडण्याची परवानगी मिळताच सुरुवातीला एक व नंतर पाचही दरवाजे उघडावे लागले आहेत."
रावसाहेब गेंगजे, कालवा निरीक्षक
"डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र असणाऱ्या आदिवासी भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. आज धरणाचे सर्व दरवाजे उघडावे लागले आहेत, पाण्याचा प्रवाह वाढल्यास रात्री अजून पाणी सोडावे लागणार असून नदी तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे"
भरत चिखले -उपअभियंता कुकडी प्रकल्प
सोबत- फोटो १३ सप्टेंबर २०२१ डिंभे पी १
डिंभे धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला असून आज धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून सुमारे पाच हजार क्युसेकने पाणी बाहेर सोडण्यात येत आहे.(छायाचित्र- कांताराम भवारी)